माझ्या सोप्या प्रश्नांनाही उत्तरे दिली नाही, त्यांचे मौनच सर्व सत्य स्पष्ट करते; राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आज संसदेमध्ये उत्तर दिले. यावेळी ते विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देखील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. यावर आता काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून पंतप्रधान शॉकमध्ये होते असे त्यांनी म्हटले आहे.

हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाला मोठा फटका बसला होता. याच पार्श्वभूमीवर विरोधक अदानी समूहाच्या जेपीसी चौकशीची मागणी करत असून मंगळवारी राहुल गांधी यांनी संसदेत बोलताना थेट पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात नेमके नाते काय, असा खणखणीत सवाल त्यांनी केला होता. तसेच त्यांनी पाच प्रश्नही विचारले होते. यावर आज पंतप्रधान संसदेत उत्तर देतील अशी अपेक्षा होती. परंतु आजच्या भाषणात त्यांनी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर दिले नाही, असे राहुल गांधी म्हणाले.

पंतप्रधान मोदी शॉकमध्ये होते. त्यांनी एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. मी काही फार किचकट प्रश्न विचारले नव्हते. मी फक्त विचारले होते की त्यांच्यासोबत किती वेळा गेला होता? किती वेळा त्यांना भेटला होता? खुप सोपे प्रश्न होते, पण उत्तरे दिली गेली नाहीत. मी समाधानी नाही. पण यातून सत्य समोर येत आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, मोदी अदानी समूहाच्या तपासाबद्दल काही बोलले नाहीत. मित्र नाही ठीक आहे, पण मग तपास करतो, असे का म्हणाले नाहीत. शेल कंपन्या आहेत, बेनामी मालमत्ता आहे, त्यावर मोदी काहीच बोलले नाहीत. म्हणजे स्पष्ट आहे की ते अदानींना पाठीशी घालत आहेत. मोठा घोटाळा आहे, मग मी तपास करतो, एवढे तरी म्हणायचे होते. पण ते अदानींना वाचवत आहेत. मी समजू शकतो.

सत्य बोललो म्हणून मी देशद्रोही ठरतो का? मल्लिकार्जुन खरगे यांचा खणखणीत सवाल

राहुल गांधी यांचे पाच सवाल

1. अदानी यांच्या विदेशात शेल कंपन्या आहेत असे हिंडनबर्ग रिपोर्ट सांगतो. या पंपन्या कोणाच्या आहेत हे सरकारने सांगावे. शेल कंपन्यांतून येणारा पैसा कुणाचा आहे?

2. पंतप्रधान मोदी यांच्या विदेश दौऱयात गौतम अदानी किती वेळा त्यांच्यासोबत होते?

3. विदेश दौऱ्यात पंतप्रधान मोदी आणि अदानी यांची किती वेळा भेट झाली?

4. मोदी विदेश दौऱ्याहून परतले की अदानी लगेच त्या देशात जातात असे किती वेळा घडले?

5. अदानी यांनी भाजपला किती पैसे दिले? इलेक्ट्रोरल बॉण्डमध्ये अदानी यांनी किती रक्कम दिली?