रायगडच्या आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ कार दरीत कोसळली, 8 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रायगडच्या महाबळेश्वर पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात रविवारी रात्री एक भरधाव स्कॉर्पिओ कार 800 फूट खोल दरीत कोसळली. या भयंकर अपघातात स्कॉर्पिओमधील आठही जणांचा मृत्यू झाला आहे. ते सर्वजण साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील आसगाव येथील रहिवासी असल्याचे समजते. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून दोन मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आले आहे. वृत्तवाहिन्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच रविवारी रात्री 10 वाजल्यापासून महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमकडून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू असून पोलीस आणि प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार मृतांमध्ये महेश अनिल पवार (वय 25), आदित्य अशोक साळुंखे (वय 21), रितेश राजेंद्र लोखंडे (वय 25), सुहास जितेंद्र लोखंडे (वय 20), अंश समीर चव्हाण (वय 18), उत्कर्ष आनंद शिंगटे (वय 21), अनिल अभिमन्यू शिंगटे (वय 25) आणि नितीन किसन नायकोंडे (वय 35) यांचा समावेश आहे.

2018 मध्ये याच ठिकाणी एक भीषण अपघात झाला होता. कोकण कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांची एक बस या दरीत कोसळून 30 जणांचा मृत्यू झाला होता.