
हमरापूर येथील अक्षर विद्यालयात शिक्षक समायोजनेसाठी पद निर्माण होऊनही अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना पुन्हा मूळ आस्थापनेवर पाठवण्यास शिक्षण अधिकारी टाळाटाळ करीत असल्याचे समोर आले आहे. याबाबत संस्थेने कायद्याची जाणीव करून देताच शिक्षण अधिकाऱ्यांनी संबंधित शिक्षकाला हजर होण्याचे आदेश दिले. मात्र प्रशासकीय अधिकारी सचिन ओव्हाळ यांच्या दडपशाहीमुळे शिक्षणाधिकारी महारुद्र नाळे यांनी पुन्हा नियम धाब्यावर बसवत आपलाच आदेश गुंडाळल्याचा आरोप अक्षर विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष विजय पाटील यांनी केला आहे. शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे या विद्यालयातील गोरगरीब विद्यार्थी वेठीला धरले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी पालकांनी केली आहे.
अक्षर विद्यालय या शाळेतील शिक्षक संजय कोळगे हे पटसंख्येअभावी अतिरिक्त झाल्याने त्यांचे दुसऱ्या शाळेत समायोजन केले होते, पण तीन वर्षांत मूळ शाळेत शिक्षकाचे पद निर्माण झाले तर पुन्हा त्या शिक्षकाला मूळ शाळेतील आस्थापनेवर पाठवायचे असते असा शासन निर्णय आहे. त्यानुसार शिक्षणाधिकाऱ्यांनी २२ ऑगस्ट रोजी त्या शिक्षकास अक्षर विद्यालयात १ सप्टेंबरपासून हजर होण्याचे लेखी आदेश दिले आहेत. आदेशाप्रमाणे हजर झाले नाही तर सेवा संपुष्टात येईल असेही आदेशात म्हटले आहे.
मात्र या शिक्षकाने हे आदेश धुडकावून हजर होण्यास नकार दिल्याचा आरोप संस्थेचे अध्यक्ष विजय पाटील यांनी केला आहे. ‘मी, त्या शाळेत पुन्हा जाणार नाही’ ही शिक्षकाची बेकायदा मागणी शिक्षण अधिकारी यांनी कशाच्या आधारे उचलून धरली असा सवाल ही त्यांनी केला आहे. शाळेला हक्काचा शिक्षक मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. याची जाणीव शिक्षणाधिकाऱ्यांना नाही का, अशी टीकादेखील पाटील यांनी केली आहे.
शिक्षकावर कारवाई करा
एकेकाळी नोकरी साठी वणवण भटकणारे संजय कोळगे हे कोल्हापूर येथून पेणला आले. त्यांना अक्षर विद्यालयाने नोकरी दिली. शाळेला शंभर टक्के अनुदान असून सातव्या वेतन आयोगानुसार महिन्याला लाखभर रुपये पगार मिळतो. असे असताना हे शिक्षक सेवेत पुन्हा रुजू होत नसल्याने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी विजय पाटील यांनी केली आहे.
बेकायदा सुनावणी
शिक्षकाची मर्जी राखण्यासाठी रातोरात बेकायदा सुनावणीचे आदेश काढले आणि शाळेच्या मुख्याध्यापकांच्या व्हॉट्सअॅपवर रात्री टाकले. १५ सप्टेंबर रोजी सुनावणी ठेवली असून ती कायद्याच्या चौकटीत बसत नाही. संस्थेविरुद्ध सदर अपील कोणत्याही कलमाखाली दाखल केले आहे याची कोणतीच कागदपत्रे प्रतिवादीला टपालाने किंवा बायहॅण्ड देऊन त्याची पोच घेतली नाही असे विजय पाटील यांनी सांगितले.