
पश्चिम रेल्वेला वर्षभरात चित्रपट आणि टीव्ही मालिकांच्या शूटिंगच्या माध्यमातून तब्बल 1 कोटी 64 लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. सदरचा महसूल आतापर्यंतचा सर्वाधिक आहे.
चर्चगेट, मुंबई सेंट्रल स्थानकासह पश्चिम रेल्वेच्या विविध ठिकाणी आणि लांब पल्ल्याच्या एक्प्रेस गाडय़ांमध्ये शूटिंग करण्यास निर्मात्यांकडून पसंती दिली जात आहे. त्यामुळे रेल्वेच्या उत्पन्नात भर पडत आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात पश्चिम रेल्वेच्या वेगवेगळय़ा 20 ठिकाणी चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण पार पडले आहे. त्या माध्यमातून रेल्वेला 1 कोटी 64 लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. मागील वर्षी केवळ 64 लाख रुपये चित्रीकरणाच्या माध्यमातून मिळाले होते. कोरोना महामारीच्या आधी 2019-20 मध्ये 1 कोटी 31 लाख रुपये मिळाले होते. दरम्यान, कोरोना काळात चित्रीकरणाच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न कमालीचे घटले होते.






























































