रेन्बो बालभारती चॅनलमुळे यंदाही आनंददायी शाळा घराघरात दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना काळात ग्रामीण भागातील मुलांचे शिक्षण थांबू नये म्हणून स्थानिक केबल नेटवर्कद्वारे निफाड तालुक्यातील कोकणगाव शिक्षण केंद्राने शैक्षणिक चॅनल सुरू केले आहे. यामुळे गेल्या वर्षी 83 गावातील एक लाख विद्यार्थ्यांना घरबसल्या मार्गदर्शन मिळाले. आता देखील परिस्थिती ओळखून 1 जुलैपासून बालभारती चॅनल क्रमांक 10 वर इयत्ता पहिली ते दहावीचे शैक्षणिक पाठ सादर करण्यास जिल्हा परिषदेच्या प्रयोगशील शिक्षकांनी सुरूवात केली आहे.

मागील वर्षी कोरोना काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती शिक्षण विभाग, तसेच जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था (डाएट) यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणगाव केंद्राने स्थानिक रेन्बो डिजिटल केबल नेटवर्कच्या मदतीने शैक्षणिक चॅनेलचा श्रीगणेशा केला. याचा ऑनलाईन शिक्षण न घेवू शकणाऱ्या गोरगरीब मुलांना फायदा झाला. यावर्षीही शाळा बंद असताना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, त्यांचे शिक्षण सुरू राहावे या हेतूने रेन्बो बालभारती चॅनल क्रमांक 10 वर 1 जुलैपासून इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत शिकवले जात आहे.

या चॅनलच्या माध्यमातून जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडू कविता राऊत, रोईंगपटू दत्तू भोकनळ, रानकवी तुकाराम धांडे, सह्याद्री फार्म्सचे संचालक विलास शिंदे अशा मान्यवरांच्या मुलाखती, यशोगाथाही प्रसारित केल्या जाणार आहेत. गाणी, खेळ, गोष्टी, बोलक्या बाहुल्या, हस्तकला, चित्रकला, यासह विशेष कार्यक्रमांची मेजवानी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. शहरी तसेच ग्रामीण भागातील पालक व विद्यार्थ्यांनी या आनंददायी शिक्षण मालिकेचा, मनोरंजनाबरोबरच व्यक्तिमत्व विकास साधणाऱ्या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याध्यापक देवेंद्र वाघ व टिमने केले आहे.