शेती करतानाचे फोटो टाकण्याऐवजी शेतकऱ्यांना तातडीने अनुदान द्या! राजू शेट्टी यांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केवळ शेती करतानाचे फोटो फक्त सोशल मीडियावर टाकू नयेत, पहिल्यांदा आमचे पैसे द्या. कर्जाची नियमित परतफेड करणाऱया शेतकऱयांच्या खात्यावर 9 ऑगस्टपूर्वी प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम जमा करा, असा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लगावला. अन्यथा पुणे-बंगळुरू महामार्ग रोखू, असा इशाराही त्यांनी आज दिला.

प्रोत्साहनपर अनुदानाच्या रकमेच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱया अतिवृष्टीग्रस्त शेतकऱयांना काही अटींमुळे 50 हजार रुपयांपर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान मिळत नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱयांना या योजनेतून वगळण्यात येणार नाही म्हणून त्वरित शासन निर्णय काढण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

या पार्श्वभूमीवर हा मोर्चा काढला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गावी शेती करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात त्याचा संदर्भ यावेळी राजू शेट्टी यांनी यावेळी आपल्या भाषणात दिला. ते भाषणात म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तुमचे शेतात काम करतानाचे फोटो आम्ही पाहिले आहेत. केवळ फोटो टाकू नका. फोटो टाकण्याआधी 9 ऑगस्टला ऑगस्ट क्रांती दिनी आमचे पैसे द्या. तुम्हाला शेतकऱयांचे आशीर्वाद मिळतील.

मोर्चामध्ये आम्ही आज छत्र्या घेऊन आलो आहोत. उद्या त्याचे भाले होतील. आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणला आहे. उद्या मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, भरपावसात स्वाभिमानींची ही फौज गोळा झाली आहे. अनुदान दिले नाही तर ही फौज मंत्रालयावर येण्यास वेळ लागणार नाही, असा इशारा शेट्टी यांनी दिला.