
वायुसेनेचे स्क्वॉड्रन लीडर राकेश शर्मा हे पहिले हिंदुस्थानी अंतराळवीर आहेत. राकेश शर्मा यांनी 3 एप्रिल 1984 रोजी अंतराळात पाऊल ठेवले अन् अवघ्या देशाची मान अभिमानाने उंच झाली. या ऐतिहासिक घटनेला 40 वर्षे झाली आहेत. याच इतिहासाची आता लवकरच पुनरावृत्ती होणार आहे.
हिंदुस्थानच्या ‘गगनयान’ मोहिमेने वेग घेतला आहे. येत्या काळात ‘गगनयान’ मोहिमेतून तीन जण अंतराळात जाणार आहेत. राकेश शर्मा या मोहिमेचे सल्लागार आहेत. त्यांनी ‘सारे जहां से अच्छा’ म्हणत ऐतिहासिक क्षणाच्या आठवणी जागवल्या आहेत. पहिल्या मोहिमेबद्दल 75 वर्षांचे राकेश शर्मा म्हणाले, मी त्या वेळी खूप एक्सायटेड होतो. सगळं काही पहिल्यांदा घडत होतं. तेवढीच उत्कंठा आज ‘गगनयान’ मोहिमेसाठी आहे. पुन्हा इतिहास घडणार आहे, पण मला वाटतंय, या वेळी हे अधिक अर्थपूर्ण आहे. हे उड्डाण एक मोठे सेलिब्रेशन ठरेल.





























































