अयोध्येतील राम मंदिराच्या नावाने लाखो भक्तांना गंडा; 3.85 कोटींचा सायबर घोटाळा उघड

अयोध्येतील राम मंदिराच्या नावाने लाखो भक्तांना गंडा घालण्यात आल्याचे उघड झाले आहे. प्रसाद आणि अभिषेकाच्या नावाने तब्बल 3.85 कोटींचा सायबर घोटाळा उघड झाला आहे. या प्रकरणी या फसवणुकीचा सूत्रधार आशिष सिंग याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून भाविकांनी अशा प्रकारच्या कोणत्याही फसवणुकीला बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

अयोध्या पोलिसांनी बनावट राम लल्ला प्रसाद बुकिंग प्रकरणी 3.85 कोटींचा घोटाळा उघडकीस आणला असून भाविकांना 2.15 कोटी रुपये परत करण्यात आले आहेत. तर या फसवणुकीच्या सूत्रधार आशिष सिंग याला अटक करण्यात आली आहे. अयोध्या पोलिसांनी भक्तांना ऑनलाइन पेमेंट करताना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. 22 जानेवारी 2024 नंतर राम लल्लाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली. या वाढलेल्या आध्यात्मिक भावनेचा फायदा घेत आरोपीने सिएटलमधील नॉर्थईस्टर्न विद्यापीठातील प्राध्यापक असल्याचे भासवले. त्याने एक बनावट वेबसाइट तयार केली आणि राम मंदिराचा प्रसाद घरपोच पोहोचवण्याचे आश्वासन दिले. या माधअयमातून देश, परदेशातील लाखो भाविकांची फसवणूक करण्यात आली.

या फसवणुकीचा सूत्रधार आशिष सिंग होता, जो मूळचा गाझियाबादमधील इंदिरापुरम येथील विंडसर पार्कचा रहिवासी आहे. तसेच तो अमेरिकेत होता. देशात परतल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. त्याने khadiorganic.com हे पोर्टल सुरू केले. 19 डिसेंबर 2023 ते 12 जानेवारी 2024 दरम्यान 6,30,000 हून अधिक भाविकांनी या साइटद्वारे प्रसादासाठी ऑर्डर दिल्या. त्यासाठी त्याने देशातील भाविकांना 51 रुपये आणि परदेशातीस भाविकांनी 11 डॉलर सुविधा शुल्क भरण्यास सांगितले गेले. सिंगने व्यवहार प्रक्रिया करण्यासाठी येस बँक, पेटीएम, फोनपे, मोबिक्विक आणि आयडीएफसी यासारख्या डिजिटल पेमेंट गेटवेचा वापर केला. त्याने एकूण 10.49 कोटी जमा केले. त्यापैकी 3.85 कोटी फक्त प्रसाद ऑर्डरमधून मिळाले.

संशयास्पद ऑनलाइन क्रियाकलाप लक्षात आल्यानंतर श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने हा घोटाळा उघडकीस आणला. त्यांनी अयोध्या सायबर क्राइम युनिटला सतर्क केले, आणि त्यांनी तपास सुरू केला. आशिष सिंग देशात परतल्यावर त्याला अटक करून फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून एक लॅपटॉप, दोन आयफोन, 13,970 रुपये रोख आणि विविध ओळखपत्रे आणि बँकिंग कागदपत्रे जप्त केली. त्यात अमेरिकेतील आणि भारतीय ओळखपत्रे, डेबिट कार्ड, वॉशिंग्टन ड्रायव्हिंग लायसन्स आणि हेल्थ कार्ड यांचा समावेश आहे. सायबर रिकव्हरी ऑपरेशनमुळे अधिकाऱ्यांना 3,72,520 भाविकांना 2.15 कोटी रुपये परत करता आले. उर्वरित 1.70 कोटी रुपये वसूल करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.