क्षुल्लक कारणावरून लग्नात राडा; जबर मारहाणीत वऱ्हाड्याचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशमधील बाराबंकी येथे ऐन लग्नात क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचं रुपांतर भयंकर हाणामारीत होऊन एकाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी काही जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

बारांबकी जिल्ह्यातील नारायणपूर येथे राहणाऱ्या स्वामी नाथ या माणसाच्या मुलीचं लग्न होतं. नवरा मुलगा सफदरगंज येथील सदेवा इथला होता. त्याची वरात नाथ यांच्या दारात आली होती. त्यांनी मनोरंजनासाठी आपल्यासोबत नाचगाण्याची व्यवस्थाही केली होती. रात्री दहा वाजता वधुपक्षातील काही जणही वरात उतरली होती त्या ठिकाणी नाचगाणं पाहायला दाखल झाले.

तिथे स्टेजवर सुरू असलेल्या नाचात वधुपक्षातील एका तरुणाने सहभागी होण्याचा हट्ट धरला. त्याला वरपक्षाने विरोध केला. त्यात सुनील चौहान नावाचा तरुण पुढे होता. मनाई करूनही वधुपक्षातील तरूण स्टेजवर चढण्यासाठी हटून बसले. तेव्हा सुनीलने ते जिथे थांबले होते, त्या घरच्या मालकांना याची कल्पना देण्यासाठी निघाला.

त्याला जाताना पाहून वरपक्षातील तरुण संतापले. त्यांनी सुनीलची वाट अडवून त्याला मारहाण करायला सुरुवात केली. या मारहाणीत सुनील गंभीर जखमी झाला. त्याला मारहाण करून ते तिथून पळून गेले.

सुनीलला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. सुनील सोबत असलेल्या एका वऱ्हाड्याने पोलिसांना बोलवलं. पोलिसांनी वधुपक्षाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.