
राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील भाजपच्या एका मित्रपक्षाने आता स्वबळाचे संकेत दिले आहे. विशेष बाब ही आहे की या पक्षाचे प्रमुख मोदी सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये सामील आहेत. या स्वबळाच्या संकेतामुळे भाजप चिंतेत पडली आहे. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान हे केंद्रात मंत्री असून बिहारमध्ये त्यांनी लोकजनशक्ती पक्ष हा स्वबळावर लढू शकतो असे संकेत दिले आहेत.
बुधवारी पासवान यांच्या पक्षाची स्थापना होऊन 20 वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलत असताना पासवान यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटले की त्यांनी बिहारच्या सगळ्या जागांवर निवडणूक लढण्याची तयारी ठवली पाहिजे. पासवान यांनी आता यापुढे निवडणुकीबाबतचे महत्वाचे निर्णय त्यांचा मुलगा चिराग पासवान घेतील असंही सांगितलं आहे.
बिहारमध्ये पासवान यांनी स्वबळाचे संकेत दिलेत मात्र दिल्लीमध्ये त्यांनी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचं जाहीर केलं आहे. पासवान यांनी स्पष्ट शब्दात NDA मधून बाहेर पडण्याचे संकेत दिले नसले तरी त्यांच्या विधानामुळे ते भाजप नेते चिंतेत पडले आहेत.
भाजपच्या मित्र पक्षांमध्ये नाराजी असून त्यातल्या एका मित्र पक्षाने म्हणजेच ‘आजसू’ पक्षाने भाजपची साथ सोडली आहे. जागावाटपामध्ये न्याय न मिळाल्याने या पक्षाने झारखंडमध्ये स्वबळावर निवडणुका लढवण्याचं निश्चित केलं आहे. वाढत्या नाराजीच्या बातम्या भाजपच्या चिंतेत भर पाडणाऱ्या आहेत


























































