रंगपट – कलात्मक उंचीकडे झेपावताना…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मर्यादांना दूर सारत आयुष्याला सकारात्मक वाटेवर नेणारा प्रवास कथन करत आहे वेशभूषाकार व अभिनेत्री चैत्राली डोंगरे.

शाळेत बालवर्गात असताना मला मांडी घालून बसता यायचे नाही; त्यामुळे मला वर्गात पाय पसरून बसावे लागायचे. पुढे माझे वय वाढत गेले, पण त्या प्रमाणात माझी उंची मात्र वाढत नव्हती. शाळेत वत्तृत्व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मी खूप उत्सुक असायचे, पण माझ्या कमी उंचीमुळे मी ध्वनिक्षेपकापर्यंत कशी पोहोचणार, असा मला प्रश्न पडायचा. पण माझ्या शिक्षकांनी एकदा मला खुर्चीवर उभे करून तो प्रश्न सोडवला. एकदा आम्हाला गृहपाठ म्हणून एका मोठय़ा व्यक्तीची मुलाखत घ्यायला सांगितले होते. रंगभूमी ही माझ्या आईची आवड होती; त्यामुळे नाटय़सृष्टीतले पंत, म्हणजेच नटवर्य प्रभाकर पणशीकर हे आमच्या ओळखीचे होते. मी त्यांची मुलाखत घेण्याचा हट्ट धरला.

माझा बालहट्ट पुरवण्यासाठी माझे वडील मला भरत नाटय़ मंदिरात घेऊन गेले. तिथे पंतांच्या ‘तो मी नव्हेच’ या नाटकाचा प्रयोग सुरू होता. नाटकाचे मध्यांतर झाले की विंगेत पंतांची नाटकातल्या पंचरंगी भूमिकेची रंगभूषा सुरू व्हायची. त्या दिवशी नाटकाचा प्रयोग संपल्यावर ते लगेच मुंबईकडे निघणार होते. एपंदर वेळेचा अंदाज पंतांना आला. त्यांनी मला उचलून कडेवर घेतले आणि ते म्हणाले, ‘विचार तुला काय विचारायचे आहे ते.’ माझी प्रश्नावली मी लिहून नेली होती. त्यांच्या कडेवर बसूनच मी त्यांना प्रश्न विचारले आणि मुलाखत व पंतांची रंगभूषा असे सर्वकाही सुरळीत पार पडले.

मी मोठी होत होते, पण माझी उंची काही वाढत नव्हती. आईबरोबर मी सगळ्या नाटय़स्पर्धा, एकांकिका स्पर्धांना आवर्जून हजेरी लावत होते. तशातच ‘सोहम एकांकिका स्पर्धा’ पार पडल्या आणि या स्पर्धेचा बक्षीस समारंभ जाहीर झाला. या स्पर्धेचे वैशिष्टय़ असे होते की, त्यांच्या या कार्यक्रमासाठी अध्यक्ष आमंत्रित केला जात नसे; तर प्रेक्षकांच्या प्रवेशपत्रिकांच्या क्रमांकातून एका भाग्यवान विजेत्याची अध्यक्ष म्हणून निवड व्हायची. या कार्यक्रमाला जाण्यासाठी मी आईजवळ हट्ट सुरू केला. अखेर आम्ही भरत नाटय़ मंदिरात दाखल झालो आणि प्रवेशिका घेऊन स्थानापन्न झालो. संस्थेचे अध्यक्ष डॉ. वि. भा. देशपांडे सरांनी, प्रमुख पाहुणे विक्रम गोखले यांना रंगमंचावर पाचारण केले. भाग्यवान विजेता म्हणून माझी प्रवेशपत्रिकाच काढली गेली. टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला; पण मी रंगमंचाच्या पायऱया चढायला लागेपर्यंत कुणाला दिसलेच नाही. रंगमंचावरील अध्यक्षांचे आसन बऱयापैकी उंच होते. तेव्हा विक्रम काकांनी मला उचलून खुर्चीवर विराजमान केले. त्या वेळीही मला पुढे नाटय़क्षेत्रातच काम करायचे असल्याचे मी माझ्या भाषणात सांगितले होते.

अगदी अलीकडे म्हणजे विक्रम काका जाण्याआधी, ‘क्यूब नाईन’ संस्थेने आयोजित केलेल्या अभिनयाच्या कार्यशाळेसाठी मला खास निमंत्रण होते. या कार्यशाळेत विक्रम काका अभिनय शिकवणार होते. अभिनयाची तोंडओळख करून देताना विक्रम काकांनी जे मुद्दे विशद केले, त्यात कुठलाही न्यूनगंड मनात असता कामा नये, यावर भर दिला. ते ऐकून माझ्या मनात विचार आला की, आपण किती भाग्यवान! शारीरिक उंची कमी असूनही मानसिक उंचीकडे झेपावताना घरच्या किंवा बाहेरच्या कुणीच मला उंचीची त्रुटी जाणवू दिली नाही. मलाही याबाबत विसर पडला आणि माझी आवड जोपासत शालेय जीवनापासून महाविद्यालयापर्यंत आणि त्यानंतरही यशस्वीपणे अभिनयाच्या क्षेत्रात मी काम केले. मात्र केवळ कमी उंचीमुळे, भूमिकांबाबत मर्यादित स्वरूपात विचार करावा लागत असल्याने, मी अभिनयाशी संलग्न अशा ‘वेशभूषा’ क्षेत्राकडे वळले. वेळोवेळी मला त्यासाठीची गौरवास्पद अशी अनेक पारितोषिके मिळाली. आर्थिक स्थैर्य व प्रसिद्धीसोबतच, मी घेतलेल्या फॅशन डिझायनिंगच्या शिक्षणालाही मला त्यामुळे न्याय मिळवून देता आला.

शब्दांकन – राज चिंचणकर