रणजी करंडक – कर्नाटक, बंगालची उपांत्य फेरी निश्चित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्रेयस गोपाळच्या नाबाद 161 धावांच्या खेळीमुळे कर्नाटकने तिसऱया दिवसाच्या खेळावरही आपले वर्चस्व राखले. त्यांनी उत्तराखंडवर 490 धावांची आघाडी घेत पहिल्या डावात 606 अशी जबरदस्त धावसंख्या उभारली. तसेच दिवसअखेर उत्तराखंडची 3 बाद 106 अशी  अवस्था करीत रणजी करंडकाच्या उपांत्य फेरी आपला प्रवेश निश्चित केला. तसेच बंगालने पहिल्या डावात 155 धावांची आघाडी घेत झारखंडची 7 बाद 162 अशी केविलवाणी अवस्था करीत आपलेही उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. पहिल्या डावातील 151 धावांची आघाडी घेणाऱया आंध्रची दुसऱया डावात 93 धावांतच दाणादाण उडाल्यामुळे हा सामना नाटय़मय वळणावर पोहोचला आहे. मध्य प्रदेशला विजयासाठी 245 धावांची गरज असून त्यांनी तिसऱया दिवसअखेर बिनबाद 58 धावा केल्या आहेत. आता ते विजयापासून 187 धावा दूर आहेत. पहिल्या डावात 128 धावांनी पिछाडीवर असलेल्या सौराष्ट्रने दुसऱया डावात 4 बाद 138 अशी मजल मारल्यामुळे हा सामनाही रोमहर्षक स्थितीत पोहोचला आहे.

बंगालही विजयाच्या उंबरठय़ावर

5 बाद 238 वरून बंगालने आपला डाव 328 पर्यंत खेचत झारखंडविरुद्ध पहिल्या डावात 155 धावांची आघाडी घेतली.  शाहबाज अहमदने 120 चेंडूंत 9 चौकार आणि 2 षटकारांची आतषबाजी करत 81 धावा ठोकल्या. अडखळत सुरुवात झालेल्या झारखंडला आर्यमन सेनच्या 64 धावांमुळे दीडशेचा टप्पा ओलांडता आला. आकाश दीप आणि आकाश घटकने मागोमाग धक्के देत झारखंडची 4 बाद 21 अशी केविलवाणी अवस्था केली, पण त्यानंतर आर्यमन सेन आणि अनुकुल रॉयने 71 धावांची भर घातली. मग विराट सिंगबरोबर 52 धावांची भागी केल्यामुळे झारखंड दीडशेपार पोहोचला.

श्रेयस गोपाळची संस्मरणीय खेळी

तब्बल 5 वर्षांनंतर शतक ठोकणाऱया श्रेयस गोपाळने 161 धावांची नाबाद खेळी करीत कर्नाटकची आघाडी 490 पर्यंत ताणली. श्रेयसने 288 चेंडूंचा सामना करत 16 चौकार आणि एक षटकार खेचला. त्याने कृष्णप्पा गौतमबरोबर सातव्या विकेटसाठी 85 धावांची भागी रचली. या भागीमुळेच त्यांना आपली आघाडी 500 पर्यंत नेता आली. कावेरप्पाने सलामीवीरांना तंबूचा मार्ग दाखवत उत्तराखंडच्या पराभवाचे अंतर कमी केले.

पंजाब विजयाच्या दिशेने

मनदीप सिंगच्या 91 धावांच्या झुंजार खेळामुळे पंजाबने आपला पहिला डाव 431 धावांपर्यंत ताणला आणि सौराष्ट्रविरुद्ध 128 धावांची महत्त्वपूर्ण आघाडीही घेतली. त्यानंतर पिछाडीवर असलेल्या सौराष्ट्रला विनय चौधरीने 3 धक्के देत अडचणीत आणले. 4 बाद 60 नंतर सौराष्ट्रवर पराभवाचे सावट होते, पण अर्पित वसावडा आणि चिराग जानीने 78 धावांची अभेद्य भागी रचत सौराष्ट्रला 138 धावांपर्यंत नेले.

आंध्रने माती खाल्ली

आज दिवसभरात सोळा फलंदाज बाद झाले. मध्य प्रदेशचा डाव 4 बाद 144 वरून  228 वर संपला आणि आंध्रला 141 धावांची आघाडी मिळाली; पण या आघाडीचा त्यांना जराही लाभ उठवता आला नाही. सौराष्ट्रच्या गोलंदाजीपुढे आंध्रचा दुसरा डाव पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळला. आवेश खान, गौरव यादव आणि कुमार कार्तिकेयच्या भन्नाट गोलंदाजीने आंध्रला 93 धावांतच गुंडाळले. त्यामुळे मध्य प्रदेश समोर विजयासाठी 245 धावांचे माफक आव्हान आहे. यश दुबे आणि हिमांशु मंत्री यांनी नाबाद 58 धावांची सलामी दिल्यामुळे हा नाटय़मय वळणावर असलेला सामनाही चौथ्याच दिवशी संपणार हे निश्चित!