रानसई धरण ओव्हर फ्लो : शनिवारपासून पर्यटकांची झुंबड उडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजकुमार भगत । न्हावाशेवा

उरण तालुक्यातील रानसई धरण शुक्रवार ६ रोजी पूर्ण क्षमतेने भरले असून सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास हे धरण ओसंडून वाहू लागले असल्याची माहिती उरण महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उप अभियंता आर.डी. बिरंजे यांनी दिली. हे धरण पर्यटकांसाठी एक पर्वणीच असते. रोज शेकडो पर्यटक या धरणाच्या पडणाऱ्या धारांमध्ये भिजण्यासाठी येत असतात. मात्र आता या हौशी पर्यटकांना आवरणे एमआयडीसीच्या कर्मचाऱ्यांना मुश्किल होणार आहे.

येथे येणारे काही पर्यटक दारू आणि बिअरच्या बाटल्या येथेच फोडून टाकून देत असल्यामुळे अनेकांना इजा होते. तर दारूच्या पार्ट्यांमुळे कधी कधी येथे भांडणे देखील होतात. त्यामुळे या पर्यटकांना आवरण्यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी एमआयडीसीने केली आहे. धरण भरल्यानंतर लगेचच शनिवार व रविवार येत असल्याने येथे मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.