पुण्यातील हडपसरमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार, गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरातील हडपसरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना ताजी असतानाच, पुन्हा एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचे उघडकीस आले आहे.

ओळखीचा गैरफायदा घेउन तरुणाने पीडित मुलीवर फेब्रुवारी महिन्यात बलात्कार केला होता. त्यानंतर मुलीने एका बाळाला जन्म दिला आहे. याप्रकरणी शनिवारी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बिट्टू शेख असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. 16 वर्षीय पीडित मुलीने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अल्पवयीन मुलगी कुटूंबियासोबत राहायला आहे. तिची एका तरुणाशी तोंडओळख होती. त्याचा गैरफायदा घेउन संबंधित मुलाने अल्पवयीन मुलीला हडपसरमधील लॉजमध्ये नेउन बलात्कार केला.

यासंदर्भात कोणाला सांगितल्यास वडिलांना ठार मारण्याची धमकी त्याने मुलीला दिली. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने घटनेची वाच्यता केली नाही. पोटात दुखू लागल्यानंतर तिला कुटूंबियांनी रुग्णालयात दाखल केले.

त्यानंतर पीडितीने एका मुलाला जन्म दिल्यानंतर घटनेला वाचा फुटली. लॉकडाउनमुळे आणि कौटुंबिक अडचणींमुळे मुलीने घडलेल्या प्रकाराबद्दल सांगितले नव्हते. त्यामुळे तक्रार देण्यास उशीर झाल्याचे पोलीस उपनिरीक्षक राजश्री पाटील यांनी सांगितले.