
सामना प्रतिनिधी । देवरुख
सेन्ट्रीग कामात मदत करण्यासाठी ठेवलेल्या तरुणीला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार करत तिच्यावर मातृत्व लादणाऱ्या देवरुखातील भाजप नगरसेविकेच्या पतीविरुद्ध पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. आरोपी अनंत पाताडे याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे .
अनंत दौलत पाताडे ४५ रा . देवरुख बोटकेवाडी हा घरे बांधण्याचे काम करतो. या कामासाठी देवरुख नजीकच्याच एका गावामधील २३ वर्षीय तरुणीला मजूर म्हणून त्याने कामाला बोलावले होते. सुमारे ९ महिन्यांपूर्वी चाकूचा धाक दाखवून पाताडे याने या तरुणीवर बलात्कार केला. त्यानंतर तिला कोंडूनही ठेवण्यात आले. असाच प्रकार १० नोव्हेंबर २०१७ रोजी घडल्याचे पीडीत तरुणीने दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. संबंधित तरूणीची जिल्हा रूग्णालयात बुधवारी प्रसुती झाली आहे.




























































