२७ जुलै रोजी दिसणार शतकातील सर्वात मोठे खग्रास चंद्रग्रहण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, नांदेड

येत्या पौर्णिमेला म्हणजेच २७ जुलै रोजी रात्री या शतकातील (२००१ ते २१००) सर्वात मोठ्या कालावधीचे खग्रास चंद्रग्रहण पाहायला मिळणार आहे. सध्या आपल्याकडे पावसाळी व ढगाळ वातावरण असल्याने आपण या संधीला मुकतो की काय, असे वाटत आहे. या वेळेस होणारे ग्रहण कालावधी सुमारे चार तास (तीन तास पंचावन्न मिनिटे) असल्याने हे सर्वात मोठ्या कालावधीचे ठरणार आहे व याच दिवशी सूर्यमालेतील क्रमांक चारचा तांबडा ग्रह मंगळ ही प्रतियुतीमध्ये येत असून तो २००३ नंतर प्रथमच इतक्या कमी अंतरावर येत आहे.

मराठवाड्यातील प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ श्रीनिवास औंधेकर यांनी सांगितले की, २७ जुलै रोजी सूर्य-पृथ्वी-चंद्र व मंगळ ग्रह-तारे हे सर्व एकाच रेषेत येत आहेत. या वेळेस खग्रास स्थितीतील तांबडा चंद्र व तेजस्वी तांबडा ग्रह मंगळ हे दोन्हीही आकाशात लक्ष वेधून घेणार आहेत.

ग्रहणाबद्दल सविस्तर
२७ जुलै २०१८ रोजी होणारे खग्रास चंद्र ग्रहण हे सारोस चक्रातील १२९ वे ग्रहण आहे. या आधीचे सर्वात मोठ्या कालावधीचे खग्रास चंद्र ग्रहण १६ जुलै २००० या दिवशी झाले होते. योगायोग म्हणजे दोन्हीही ग्रहणे एकाच सारोस चक्रातील आहेत. पृथ्वीच्या पूर्व गोलार्धातील जवळपास सर्वच खंडातून (युरोप, आफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड व दक्षिण अमेरिका ) हे ग्रहण पहायला मिळणार आहे. संपूर्ण भारतातून या ग्रहणाच्या सर्व स्थिती पाहायला मिळणार आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.

या वेळेस जागतिक वेळेनुसार १८:२४ (भारतीय प्रमाण वेळ २३:५४) वाजता चंद्र पृथ्वीच्या पश्चिमेकडील बाजूने विरळ छायेमध्ये प्रवेश करणार आहे, खग्रास स्थिती जागतिक वेळेनुसार १९:३० (भारतीय प्रमाण वेळ दिनांक २८ जुलै रोजी १.००) वाजता सुरु होणार आहे. ग्रहण मध्य जागतिक वेळेनुसार २०.२२ (भारतीय प्रमाण वेळ दिनांक २८ जुलै रोजी १.५२) होणार आहे. जागतिक वेळेनुसार २१.१३ (भारतीय प्रमाण वेळ दिनांक २८ जुलै रोजी २.४३) ग्रहणाची खग्रास स्थिती संपेल व चंद्र विरळ छायेतून दिसायला सुरुवात होईल व जागतिक वेळेनुसार २२.१९ वाजता (भारतीय प्रमाण वेळ दिनांक २८ जुलै रोजी ३.४९ वाजता) ग्रहण समाप्ती होणार आहे.

चंद्र पृथ्वी भोवती फिरतांना दीर्घ वर्तुळाकार कक्षेत फेरी मारतो. वर्षभरातील दुरस्त अंतर हे जुलै महिन्यात असते तसेच जुलै महिन्यातील दुरस्त अंतर ही दिनांक २७ जुलै रोजीच आले आहे. चंद्र आकाशात आकाराने वर्षातील सर्वात लहान आकारात दिसणार असून ग्रहण काळात पृथ्वीच्या दाट छायेतून प्रवास करतांना जास्त वेळ घेणार आहे. या मुळेच हे खग्रास चंद्र ग्रहण सर्वाधिक कालावधीचे असणार आहे.

मंगळ ग्रह प्रतियुतीमध्ये
दिनांक २७ जुलै रोजी जागतिक वेळेनुसार सकाळी ७.५० वाजता (भारतीय वेळेनुसार दुपारी १.२० वाजता ) सूर्यमालेतील चौथा गृह मंगळ सूर्याशी प्रतीयुतीमध्ये येत आहे. या दिवशी सायंकाळी सूर्य पश्चिम आकाशात मावळला की पूर्व आकाशात पौर्णिमेचा चंद्र व त्या जवळच तेजस्वी तांबडा मंगळ ग्रह दिसणार आहे. या वेळेस पृथ्वी मंगळ अंतर हे ५.७६ कोटी किमी असणार आहे.

सन २००३ च्या २७ ऑगस्ट रोजी हाच मंगळ आपल्या साथ हजार वर्षातील सर्वात कमी अंतरावर म्हणजेच ५.५६ कोटी किमी अंतरावर होता. या वेळेस आकाश निरभ्र असल्यास दुर्बिणीतून निरीक्षण केले असता मंगळ ग्रहाच्या उत्तर ध्रुवावरील असलेला बर्फाच्छादित प्रदेश पाहायला मिळू शकतो, असेही श्रीनिवास एस. औंधकर यांनी सांगितले.