Ratnagiri News – दुर्वास पाटील प्रकरणात जयगड पोलीस दोषी आढळल्यास कारवाई होणार, पोलीस अधीक्षकांचा इशारा

खंडाळा येथील सायली देशी बारचालक दुर्वास पाटील याने केलेल्या तिहेरी हत्याकांडाचा तपास सुरू आहे. दुर्वास पाटीलने दिलेली माहिती खरी आहे का हे तपासात उघड होणार आहे. सीताराम वीरकडे भक्ती मयेकरचा मोबाईल नंबर कसा आला? विश्वास पवार दुर्वास पाटीलने केलेल्या प्रत्येक हत्येत का सहभागी होत होता? या सर्व गोष्टी तपासात उघड होणार आहेत. राकेश जंगम बेपत्ता प्रकरणात जयगड पोलिसांनी केलेल्या तपासाची चौकशी होणार असून जयगड पोलीस दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करू असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

राकेश जंगम याची हत्या करून दुर्वास पाटील, विश्वास पवार आणि निलेश भिंगार्डे यांनी आंबा घाटातील दरीत टाकला होता. पोलिसांना राकेश जंगमचा मृतदेह सापडला नाही. मृतदेह एक वर्षापूर्वी टाकल्याने त्याचे अवशेषही सापडले नाहीत. तसेच त्या परिसरात पावसामुळे घनदाट झाडी वाढली असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी सांगितले.

हत्याकांड उघडकीस आल्यानंतर दुर्वास पाटील याचा खंडाळ्यातील सायली बार पहिल्या दिवशी बंद करण्यात आला होता. मात्र तो देशी बार पुन्हा सुरु झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मात्र सायली देशी दारू बार बंद करण्याबाबत अहवाल पाठवल्याचे बगाटे यांनी सांगितले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी आणि पोलीस निरीक्षक नितीन ढेरे उपस्थित होते.