रत्नागिरी शेट्ये नगर येथे आज पहाटे गॅस गळतीने स्फोट, दोन महिलांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी शहरापासून काही अंतरावर असलेल्या शेट्ये नगर येथे बुधवारी पहाटे 5 वाजता घरगुती गॅसची गळती होऊन मोठा स्फोट झाला. या स्फोटात कुटुंबातील चार जण अडकले होते. त्यापैकी दोघांना बाहेर काढण्यात यश आले असून दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अल शिफा या इमारतीतील अश्फाक अहमद काझी (52) यांच्या घरात गॅस गळती होऊन स्फोट झाला. रात्रीच्या वेळी घरगुती सिलेंडर मधून गॅस गळती होऊन गॅस घरात पसरला होता. अश्फाक काझी सकाळी पाच वाजता उठले तेव्हा त्यांनी लाईटचे बटन सुरू केले. त्याचवेळी स्फोट झाला. सर्वप्रथम फ्रिज उडून त्यांच्या अंगावर पडला आणि काही क्षणात घराचे स्लॅब कोसळले. या दुर्घटनेत अश्फाक काझी, अम्मार काझी, रेश्मा खान हे जखमी झाले. कनिष काझी, नुरूनिस्सा अलजी या दोघी स्लॅबच्या ढिगाऱ्याखाली सापडले. त्यांना बाहेर काढण्यासाठी जेसीबी बोलावण्यात आला होता. मात्र कनिष काझी, नुरूनिस्सा अलजी या दोघींचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मुंबई एटीएस घटनास्थळी
स्फोटाची बातमी पसरताच मुंबई एटीएसचे पथक तेजस एक्स्प्रेसने घटनास्थळी दाखल आहे. तसेच कोल्हापूर येथूनही एक पोलीस पथक पाहणीसाठी आले. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे आणि शहर पोलीस निरीक्षक घटनास्थळी हजर होते.