
लॉकडाऊन सुरू असतानाही हॉटेल सुरू ठेऊन खासगी ट्रव्हल्स मधून आलेल्या प्रवाशांना टेबल सर्व्हिस देणाऱ्या मुंबंई-गोवा महामार्गा जवळील निवळी येथील हॉटेल वृंदावनवर जिल्हाधिकारी यांनीच धाड टाकली. त्यानंतर तहसीलदार शशिकांत जाधव यांनी कारवाई करत वृंदावन हॉटेलला सील ठोकले. तसेच 13 हज़ार रुपयांचा दंडही ठोठावला.
कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रतिबंधक आदेश जाहीर केलेले आहेत. या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व हॉटेल व रेस्टॉरंट यांना सकाळी 7.00 ते रात्री 8.00 या कालावधीत कोरोना नियमावलींचे पालन करुन फक्त घरपोच सेवा (Home Delivery) देण्याची मुभा देण्यात आली आहे. या नियमावलीनुसार हॉटेलमध्ये बसून जेवण्यास मनाई आहे, तसेच हॉटेलच्या सेवा पुरवठादाराला कोरोना चाचणी किंवा लसीकरण केलेले असणे बंधनकारक आहे. दि. 25 मे रोजी रात्री 9.00 वा जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथील हॉटेल वृंदावनला भेट दिली असता हे हॉटेल सुरू असल्याचे व एका ट्रव्हल्समधील प्रवासी हे टेबल सर्व्हीस घेताना आढळले. त्याचप्रमाणे याठिकाणी गर्दी सुध्दा दिसून आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने तहसीलदार रत्नागिरी, पोलीस निरीक्षक रत्नागिरी ग्रामीण, उपप्रादेशीक परिवहन अधिकारी व अन्न व औषध प्रशासन या विभागांमार्फत वृंदावन हॉटेलवर संयुक्त कारवाई करण्यात आली.
कारवाईमध्ये हॉटेलात टेबल सर्व्हीस देणे, सेवा पुरवठादार यांची कोरोना टेस्ट केलेली नसणे, कोरोना नियमावलींचे उल्लघंन केल्याने तहसीलदार शशिकांत जाधव यांनी तात्काळ हॉटेल वृंदावन हे पुढील आदेशापर्यत सीलबंद केले आहे, तसेच कोरोना नियमावलींचा भंग केल्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाने सदर हॉटेलवर आस्थापनावर रक्कम 13000 रूपयांची दंडात्मक कारवाई केली आहे.हे हॉटेल सील करण्याच्या कारवाईत तहसीलदार शशिकांत जाधव यांच्यासोबत मंडल अधिकारी पाली सुरेंद्र कांबळे, मंडल अधिकारी रत्नागिरी विलास सरफरे, तलाठी अरविंद शिंदे, महसुल सहायक रवी खाके व कोतवाल डिचोलकर यांनी सहभाग घेतला आणि दंडात्मक कारवाई अन्न व औषध विभागामार्फत पाचपुते, निरीक्षक अन्न व औषध प्रशासन यांच्या पथकाने केली. याशिवाय याठिकाणी मुंबईला जाणारी एक ट्रव्हल्स काही प्रवाशांसह उभी होती. सदर ट्रव्हल्सवर उपप्रादेशीक अधिकारी व पोलीस विभागामार्फत रात्री उशीरापर्यत कारवाई चालु होती.
या अनुषंगाने तालुक्यातील सर्व हॉटेल आस्थापनाना/सेवा पुरवठादारांना तालुका प्रशासनातर्फे पुन्हा एकदा सुचना देण्यात येत आहेत की, हॉटेल व रेस्टारंट यांनी सकाळी 7.00 ते रात्री 8.00 या कालावधीतच फक्त घरपोच सेवा द्यावयाची आहे. तसेच हॉटेल सेवापुरवठादार/डिलीव्हरी बॉय/इतर कोणामार्फत उदा. Swiggy, unbox इ मार्फत होम डिलीव्हरी देत असतील तर सदर डिलीव्हरी करणार्यांरचे कोरोना चाचणी (जास्तीत जास्त 10 दिवस अलीकडील) निगेटीव्ह अहवाल सोबत बाळगणे आवश्यक आहे याबाबत आस्थापनांनी सुद्धा खात्री करावी. हॉटेल आस्थापनाच्याठिकाणी कोरोना नियमावलींचे पालन केले जाईल याची दक्षता घेण्यात यावी असे सर्व हॉटेल आस्थापना व सेवा पुरवठादार यांना तहसीलदार शशिकांत जाधव आवाहन केले आहे.
























































