रवींद्र घुगे मुंबई हायकोर्टाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायमूर्ती रवींद्र विठ्ठलराव घुगे यांची हायकोर्टाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती केली आहे पेंद्र सरकारने तशी अधिसूचना काढली.

9 जुलै 1966 रोजी जन्मलेले न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी कोल्हापूर येथील सेंट झेवियर्स हायस्कूल येथे शालेय शिक्षण घेतले. त्यानंतर कोल्हापूरच्या शहाजी लॉ कॉलेज आणि छत्रपती संभाजीनगर येथील एम.पी. लॉ कॉलेजमधून 1990 मध्ये त्यांनी पाच वर्षांचा कायद्याचा अभ्यासक्रम पूर्ण केला. 1990 पासून त्यांनी मुंबई उच्च न्यायालय तसेच औद्योगिक आणि कामगार न्यायालयांमध्ये वकिली केली.

सुरुवातीच्या काळात त्यांनी जवळपास 2 हजार प्रकरणांमध्ये कामगार आणि कामगार संघटनांचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर त्यांनी बहुराष्ट्रीय पंपन्यांसह सुमारे 250 उद्योगांचे तसेच बार कौन्सिल ऑफ इंडियाचे विविध प्रकरणांत प्रतिनिधित्व केले. न्यायमूर्ती घुगे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे एलएल.एम. अभ्यासक्रमासाठी सहयोगी प्राध्यापक म्हणून अध्यापनही केले आहे. तसेच त्यांनी संभाजीनगर येथील औद्योगिक वकील संघटनेचे सचिव आणि अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. 21 जून 2013 रोजी त्यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली.