आरबीआयचा गव्हर्नर बनण्यासाठी काय पात्रता हवी?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आरबीआय ही हिंदुस्थानची मध्यवर्ती बँक आहे. हिंदुस्थानचे आर्थिक स्थैर्य राखणे व मौद्रीक नीती ठरवणे, हे बँकेचे मुख्य कार्य आहे. सामान्यांच्या भाषेत सांगायचे तर महागाई अति वाढू न देता देशाचा आर्थिक विकास साधण्याची कसरत या बँकेस करावी लागते. एक रुपयाची नोट व सगळ्या नाणी वगळता इतर सगळ्या नोटा छापण्याचा अधिकार आरबीआयला आहे. या सर्व नोटांवर आरबीआयच्या गव्हर्नरची स्वाक्षरी असते. आरबीआय गव्हर्नर हे या बँकेचे प्रमुख असतात. आरबीआय अधिनियम 1934 नुसार बँकेस 1 गव्हर्नर व चार डेप्युटी गव्हर्नर (1+ 4), वित्त मंत्रालायाचे 2 प्रतिनिधी व यांच्या दिमतीला 14 सदस्यांचे संचालक मंडळ असते. यासोबतच आरबीआयचे दैनंदिन कामकाज करणारा आरबीआय कॅडरचा कर्मचारी वृंद असतो.

आता वळूया मूळ प्रश्नाकडे, आरबीआयचा गव्हर्नर बनण्यासाठी काय पात्रता हवी?

आरबीआयच्या अधिनियमात अशी काही पात्रता नमूद करण्यात आली नाही. पण आत्ता पर्यंतच्या एकंदरीत संकेतावरून (convention) आपण असे म्हणू शकतो की –

  • ती व्यक्ती ही अर्थशास्त्र / मौद्रीक अर्थशास्त्र किंवा वित्तीय व्यवस्थापन या विषयात उच्च विद्याभूषित असावी.
  • सरकारी बँकेत प्रमुख किंवा सर व्यवस्थापक असावी.
  • बँकिंग विषयातील तज्ञ व्यक्ती असावी.
  • आंतरराष्ट्रीय नाणे निधी किंवा जागतिक बँक किंवा तत्सम वित्तीय संस्थांमधील कामकाजाचा अनुभव असावा.
  • केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयात वित्त / अर्थ / महसूल सचिव इत्यादी पदावरील कामकाज व प्रशासकीय अनुभव असावा.
  • किमान वय 35 वर्षे असावे.
  • ती व्यक्ती संसदेच्या कोणत्याही सभागृहाची (लोकसभा किंवा राज्यसभा) किंवा राज्य विधिमंडळाची (विधानसभा किंवा विधान परिषद) सदस्य नसावी.
  • केंद्र सरकार / राज्य सरकार मध्ये कोणतेही लाभाचे पद (office of profit) धारण केलेले नसावे.
  • आरबीआयची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी हिल्टन यंग आयोगाच्या शिफारशी वरून करण्यात आली. ऑसबॉर्न स्मिथ या ब्रिटिश व्यक्तीची आरबीआयचे पहिले गव्हर्नर म्हणून नेमणूक करण्यात आली. ते एक बँकर होते.

आरबीआयचे पहिले हिंदुस्थानी गव्हर्नर म्हणून चिंतामण द्वारकानाथ देशमुख (C. D. Deshmukh) यांची 1943 मध्ये नेमणूक करण्यात आली. ते आधी रिझर्व्ह बँकेतच संचालक व तद्नंतर डेप्युटी गव्हर्नर या पदावर कार्य करत होते. इतर तत्कालीन ब्रिटिश लोकांना नामोहरम करत त्यांनी गव्हर्नर पद पदरात पाडून घेतले व हिंदुस्थानी गव्हर्नरांची परंपरा सुरू केली. कोरा (quora) या प्रश्न उत्तरांच्या एका संकेतस्थळावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना प्रदीप रेड्डी यांनी ही माहिती दिली.