दखल : तरल भावनांची प्रचीती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

> अस्मिता प्रदीप येंडे

कविता म्हणजे भावनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, कवीच्या मनाचे प्रतिबिंब असते. प्रा. विजया पंडितराव यांचा ‘मनस्वी’ हा पहिलाच काव्यसंग्रह… वयाच्या साठीनंतर त्यांनी कविता लेखनास सुरुवात केली असली तरी त्यांच्या कविता या अनुभवजन्य, प्रगल्भ आणि स्व-शोध घेणाऱ्या आहेत. कारण घर, नोकरी हे सर्व करत असताना कुठेतरी त्यांच्यात कवितेविषयीचं आपलेपण रुजत असतानाच स्वतःची नव्याने ओळख झाली ती कवयित्री म्हणून. ‘मनस्वी’ काव्यसंग्रह सृजनसंवाद प्रकाशनने प्रकाशित केला असून प्रत्येक कविता एक वेगळा दृष्टिकोन देऊन जाते.

‘मनस्वी’ या काव्यसंग्रहातून कवयित्रीचे तरल, संवेदनशील मन तसेच संयमी आणि सत्य स्वीकारून धीटपणे जगण्याची उमेदही दिसून येते. ‘माझी कविता’ या कवितेत कवयित्री सांगते आहे,

नाही आवड़ नटण्याची

प्रतिमांचा तिज नको फुलोरा

हवी सावली अर्थाची…

‘झिम्माड़ झिम’, ‘कोकणची भूमी’, ‘कधी वाटते’ या कवितांमधून कवयित्री बालपणीच्या आठवणीत रमली आहे. यात काही निसर्ग कवितांचासुद्धा समावेश आहे. ‘ऊन’ या कवितेत उनाच्या विविध रंगछटा दिसून येतात. ‘आनंदाचे गाणे’ ही कविता बालकवींची आपसूक आठवण करून देते.

‘माझ्यासाठी’ या कवितेतील ‘ती’च्या मनाची द्विधावस्था मन सुन्न करणारी आहे. पंडितराव यांच्या काही कविता या स्त्री-अस्तित्वाची दखल घेणाऱ्या आहेत. ‘बाई सीतामाई’, ‘ती’, ‘बये’, ‘गौराई’ या कविता स्त्रीविश्व अधोरेखित करणाऱ्या आहेत.

‘ब्लँक स्क्रीन’ ही कविता हरवत चाललेल्या माणूसकीविषयी खंत व्यक्त करणारी आहे. ‘स्टेट्स’ ही कविता विधवा स्त्राrकड़े बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन मांडते.

प्रिय व्यक्तीच्या अकस्मात जाण्याने अचानक आलेले एकाकीपण ‘आपलं माणूस जातं तेव्हा’, ‘केव्हातरी’, ‘व्यथा मनाची’, ‘अनोळखी’, ‘तू-मी’ अशा कवितांमधून निसर्गप्रतिमांच्या आधारे व्यक्त झाले आहे. मनातलं साचलेपण यातून रीते झाले आहे.

निसर्ग, प्रेम, एकटेपणा, स्त्रित्व, दुःख, सामाजिक, वैचारिक अशा आशयाने सजलेल्या कविता या संग्रहात समाविष्ट आहेत. कवितांमध्ये शब्दप्रतिमांचा सुरेख वापर केला आहे. सकारात्मक ऊर्जा देणारा हा ‘मनस्वी’ ऊर्जास्रोत आहे.

मनस्वी

लेखिका ः प्रा. विजया पंडितराव

प्रकाशक ः सृजनसंवाद प्रकाशन

मूल्य ः रुपये 225/-