मोदी,शहांच्या चक्रव्यूहात काँग्रेस अडकली,राफेल, जीएसटी, नोटाबंदी मुद्दे निष्फळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
rahul-gandhi-modi

सामना ऑनलाईन, मुंबई

पुलवामा दहशतवाद हल्ला आणि त्यानंतर हिंदुस्थानी लष्कराने सर्जिकल स्ट्राइकच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिले. त्याबद्दल प्रश्न उपस्थित करत राफेल खरेदी व्यवहार, नोटाबंदी, जीएसटी यासारखे मुद्दे उपस्थित करत भाजप सरकारविरोधात वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. त्याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यात काँग्रेसचे नेतृत्व विचलित होईल असा मुद्दा प्रचारादरम्यान चर्चेत आणला. या मोदी-शहांच्या चक्रव्यूहात काँग्रेस नेते स्वतःचा जाहीरनामासुद्धा विसरले.

भाजपने मोदींना ‘लार्जर दॅन लाइफ’ असे सादर केले. देशासाठी मोदी हे एकमेक पर्याय  असल्याचा प्रचार केला, परंतु त्याच वेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबाबत काँग्रेसच्या नेत्यांना जनतेच्या मनात विश्वास निर्माण करता आला नाही. प्रियंका गांधी यांना काँग्रेसने निवडणुकीच्या मैदानात आणले खरे, पण त्यांच्या नेतृत्वाचा उपयोग देशभरात करण्याऐवजी फक्त उत्तर प्रदेशपुरते मर्यादित ठेवण्याची चूक काँग्रेसने केली. भाजपनेही प्रियंका अमेठी व रायबरेलीच्या बाहेर पडणार नाहीत याची पूर्ण काळजी घेतली. याचा परिणाम उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली या उत्तरेकडील काँग्रेसवर झाला.

नोटाबंदी, रोजगार, जीएसटीचे मुद्दे

नोटाबंदी, रोजगार आणि जीएसटी यांसारखे मुद्दे काँग्रेस-राष्ट्रवादीला निवडणुकीचे मुद्दे बनवता आले नाहीत. शेतकऱ्यांची सरकारवर असलेली नाराजीही आघाडीला कॅश करता आली नाही. राफेल करार, ईव्हीएम मशीन यासारख्या मुद्दय़ांवर स्वतःच काँग्रेसचे नेतृत्व फसले.

राष्ट्रवादाला पर्याय नाही

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक करून उत्तर दिले. हिंदुस्थानी हवाई दलाने दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. दहशतवादाला उत्तर देण्यासाठी भाजप आणि मित्रपक्षांचे सरकार केंद्रात हवे अशी राष्ट्रादाची भावना निर्माण भाजपने निर्माण केली.