
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ राज्यातील गरीब व गरजू महिलांसाठी सुरू करण्यात आली. मात्र या योजनेमध्ये पुरुषांनीही घुसखोरी केल्याचे पडताळणीमध्ये समोर आले. सुमारे 14 हजार पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. आता त्यांच्याकडून ते पैसे वसूल केले जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
ई-केवायसीनंतर ‘लाडकी बहीण योजने’तून तब्बल 80 लाख महिला अपात्र ठरल्या. त्यावरून महायुती सरकारवर विरोधकांकडून टीकेचा भडिमार सुरू आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्याबाबत भाष्य केले. अपात्र ठरलेल्या बहिणींकडून पैसे वसूल केले जाणार नाहीत, मात्र त्यांच्या नावाने या योजनेचे पैसे लाटणाऱ्या पुरुषांकडून मात्र ते पैसे वसूल केले जातील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
केवायसी पुन्हा सुरू करू
कोणत्याही पात्र महिलांना या योजनेतून वगळण्यात आलेले नाही, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, केवायसी पूर्ण झालेल्या महिलांचे पैसे सुरू राहतील. अनेक महिलांनी केवायसी केली नाही म्हणजे त्या योजनेचे निकष पूर्ण करत नाहीत असा अर्थ होतो. तरीसुद्धा ज्या पात्र महिलांना काही कारणास्तव केवायसी करता आलेली नाही त्यांच्यासाठी केवायसी विंडो पुन्हा सुरू केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
































































