
जिल्ह्यात आज दुसऱ्या दिवशीही सकाळपासून पावसाची संततधार सुरूच राहिली. त्यामुळे दुपारपर्यंत 32.7 फुटांवर स्थिरावलेल्या पंचगंगेची वाटचाल पुन्हा एकदा इंचा-इंचाने इशारा पातळीकडे सुरू झाली होती. राधानगरीसह सर्व धरण प्रकल्प अर्ध्याहून अधिक भरले असून, विसर्गही सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे. जिह्यातील 42 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान, हवामान खात्याकडून जिह्यात 15 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, उद्या (दि. 12) रेड अलर्ट देण्यात आला आहे.
कोल्हापूर जिह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून संततधार पावसाची उघडझाप सुरू आहे. नद्यांच्या पातळीत इंचा-इंचाने कधी वाढ, तर कधी घट दिसून येत आहे. काल सकाळपासूनही दिवसभरात संततधार पाऊस झाला. सायंकाळनंतर नद्यांच्या पातळीत इंचाने घट होत होती. काल सायंकाळी चारच्या सुमारास 33.1 फूट झालेल्या पंचगंगेच्या पातळीत पाच नंतर इंचाने घट होऊ लागली. रात्री 11च्या सुमारास 32.11 इंचावर ही पातळी स्थिरावली होती. आज दुपारी तीनपर्यंत 32.7 फुटांवर स्थिरावली होती. मात्र, आज सकाळपासून पुन्हा संततधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे सायंकाळनंतर पुन्हा तासाला इंचाने वाढ होऊ लागली. सहाच्या सुमारास 32.10 अशी तीन इंचाची वाढ झाली होती. जिह्यात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 82.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे.


























































