
गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात मुंबईसह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. कोकणात तर पावसाने कहर केला असून अनेक ठिकाणी पुरसदृश परिस्थिती झाल्याने अक्षरशः दाणादाण उडाली आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशला तर पावसाने चांगलेच झोडपले असून अनेक जिह्यांना पुराने वेढले आहे, त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुढचे तीन दिवस महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, कर्नाटक आणि गोव्यासाठी पुढचे तीन दिवस हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा म्हणजेच पावसाचा ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे.
मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, ओडिशा आणि छत्तीसगड तसेच मेघालय, बिहार, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश आणि झारखंड येथेही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बिहारमध्ये घाघरा, गंडक, बागमती, कमला बलान, कोसी, महानंदा आणि परमान नदी धोक्याची पातळी ओलांडण्याच्या स्थितीत असून राज्यात गेल्या 48 तासांत तब्बल 25 जणांचा वीज पडून मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
उत्तर प्रदेशात 20 लाख लोकांना पुराचा फटका
उत्तर प्रदेशात सर्वात भयंकर स्थिती असून पीलभीत, लखीमपूर खिरी आणि शाहजहांपूर येथील तब्बल 20 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. अनेक वाहने बुडाले असून एका ठिकाणी तब्बल दोन तास एक बस पुराच्या पाण्यात अडकली होती. त्यानंतर त्वरित मदतकार्य सुरू करून सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
मुंबईत पावसाचा ऑरेंज अलर्ट
मुंबईत पुढील तीन दिवसांसाठी पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. अधुनमधून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबई महापालिकेनेही नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले असून मुंबईत ताशी 50 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात असे म्हटले आहे. दरम्यान, महाराष्ट्रात रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा या जिह्यांसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे.
एक्प्रेस-वेवर अक्षरशः पाण्याचे पाट
लोणावळा शहर व घाटमाथ्यावर मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आज मुंबई पुणे एक्स्प्रेस-वे-लादेखील बसला. अमृतांजन पुलाच्या खालील बाजूला असलेल्या उतारावरून मुंबईहून पुण्याकडे येणाऱया मार्गिकेवर अक्षरशः पाण्याचे पाट वाहत होते. रस्त्यावर एक ते दीड फूट पाणी साचल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करीत पाण्यामधून ही चढण चढण्याची वेळ आली. अनेक वाहने यावेळी बंददेखील पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. या ठिकाणी यापूर्वी असे प्रकार कधी घडलेले नाहीत. मात्र, आज या ठिकाणी कोणत्या कारणामुळे एवढय़ा मोठय़ा प्रमाणात पाणी आले याचा शोधदेखील घेतला जात आहे. लोणावळा घाट माथ्यावर शनिवारपासून जोरदार पाऊस सुरू आहे. शनिवारी 24 तासांमध्ये या भागात 216 मिलीमीटर, तर आज रविवारी दिवसभरामध्ये 140 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर घाटमाथ्यावर वाढत असल्याने डोंगर भागातून मोठय़ा प्रमाणात पाणी वाट मिळेल त्या बाजूला जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर मुंबईकडून पुण्याकडे येणाऱया मार्गिकेवर हे पाणी वाहत असल्याने अमृतांजन पुलाजवळील चढण चढत असताना वाहनचालकांना याचा मोठा फटका बसला आहे.