अटकेतील पाच आरोपींविरोधात 730 पानांचे आरोपपत्र, बाळ बोठेच्या अटकेनंतर पुरवणी आरोपपत्र दाखल करणार

रेखा जरे खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींविरुद्ध पारनेरच्या न्यायालयात तब्बल 730 पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती तपासी अधिकारी अजित पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, फरार मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठेविरुद्ध त्याच्या अटकेनंतर पुरवणी दोषारोपपत्र दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

ज्ञानेश्वर उर्फ गुडू शिवाजी शिंदे (रा. श्रीरामपूर), फिरोज राजू शेख (रा. राहुरी), आदित्य सुधाकर चोळके (रा. कोल्हार बुद्रूक), सागर भिंगारदिवे व ऋषिकेश पवार (रा. नगर) या आरोपींविरोधात आज दोषारोपपत्र दाखल झाले आह़े  याप्रकरणी सिंधूबाई सुखदेव वायकर (वय 60, रा. माळीबाभळगाव ता. पाथर्डी) यांनी फिर्याद दिलेली आहे.

नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घायात येथे 30 नाहेंबर 2020 रोजी रेखा जरे यांची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी जरे यांच्या आईने फिर्याद दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. जरे यांच्यावर हल्ला करणाऱया दोघांपैकी एकाचा फोटो जरे यांच्या मुलाने काढला होता. याच फोटोवरून पोलिसांनी दोघाही आरोपींना अटक केली.

त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आणखी तिघांना अटक करण्यात आली. त्यांची कसून चौकशी करण्यात आली असता, बाळ बोठे हा रेखा जरे यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याची माहिती पुढे आली. सागर भिंगारदिवे याच्यामार्फत बोठे याने जरे यांच्या हत्येची सुपारी दिली होती. त्यानंतर मोबाईल सीडीआरवरून रेखा जरे यांच्या हत्येचा बोठे हाच सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले होते.

पाच आरोपी अटक करण्यात आल्यानंतर मुख्य आरोपी बोठे हा अजूनही फरारच आहे. त्याचा सत्र न्यायालय, उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे. आता त्याने सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज सादर करण्याची तयारी सुरू केली आहे.

या दोषारोपपत्रात रेखा जरे यांचा खून हा खंडणी घेऊन झाल्याचे म्हटले आहे. त्याबाबतचे सर्व पुरावे जोडण्यात आलेले आहेत. जरे व आरोपी बोठे यांच्यातील संभाषणासह इतर भरीव पुरावेसुद्धा दाखल झालेले आहेत. हत्याकांडानंतर घेतलेले 90 जणांचे जबाब या दोषारोपपत्रात नोंदवलेले आहेत.

दोन ते तीन ठिकाणी जरे यांना मारण्याचा कट शिजल्याबाबतचे पुरावे यामध्ये जोडलेले आहेत. जरे यांच्या हत्येच्या आठ दिवस आधी पाथर्डी तालुक्यात त्यांना अपघातात ठार मारण्यात येणार होते. ते वाहनही पोलिसांनी जप्त केले आहे.

यासह आरोपींचे जबाबही सादर करण्यात आलेले आहेत. आरोपींच्या ताब्यातून खंडणीसाठी दिलेले 8 लाख 20 हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. रेखा जरे यांनी चार पानी चिठ्ठी लिहून ठेवली होती. ती तपासणीसाठी पाठविण्यात आली आहे. त्याचीसुद्धा नोंद या दोषारोपपत्रात करण्यात आली आहे.

जरे खून प्रकरणामध्ये मुख्य आरोपी म्हणून पत्रकार बाळ बोठे याचा समावेश आहे. तो या घटनेमध्ये सहावा आरोपी आहे. त्याच्या घरातून ज्या ज्या वस्तू मिळालेल्या आहेत, त्याचा सर्व उल्लेख दोषारोपपत्रामध्ये करण्यात आलेला आहे.  

चाकू ऑनलाइन खरेदी केला

रेखा जरे यांच्या हत्येसाठी वापरलेला चाकू आरोपींनी ऑनलाइन खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यावरून पोलिसांनी संबंधित कंपनीशी तत्काळ संपर्क केला. या आरोपींनी दोन वेळा चाकू मागविला होता. तसेच, ज्या हत्याराने जरे यांचा खून केला तो चाकू त्याच कंपनीकडून मागविण्यात आल्याचे सिद्ध झाले असून, पोलिसांनी त्याचे पुरावे जोडले आहेत.

जरे कुटुंबीय उपोषण करणार

रेखा जरे यांच्या हत्येला 87 दिवस उलटून गेले आहेत. मुख्य सूत्रधार बाळ बोठेला लपविण्यामागे कोण आहे, बोठे फरार असूनही त्याच्या घराला टाळे नाही, त्याची सर्व यंत्रणा घरातला कर्ता पुरुष घरी नसतानाही सुरळीत सुरू आहे. मी आणि माझ्या वकिलांनी वेळोवेळी पोलीस यंत्रणेला अर्ज दिले. मात्र, अद्यापही उत्तरे मिळू शकलेली नाहीत. त्यामुळे 5 मार्च रोजी कुटुंबीयांसह पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे कुणाल जरे याने म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या