माझी लेखनयात्रा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा. रेखा विनायक नाबर, निवृत्त उपप्राचार्या, एस.आय.ई.एस. कॉलेज 

बालपणापासून मला विज्ञान आणि त्याच्याशी संबंधित गोष्टी वाचायला आवडायच्या. त्यातूनच माझा कल वैज्ञानिक विषयांकडे आहे, आवडही त्याच विषयांकडे आहे हे पालकांनी ओळखले. त्याच दृष्टीने त्यांनी मला मार्गदर्शन केले आणि मी वैज्ञानिक विषयात हळूहळू तरबेज होत गेले. म्हणूनच मग पुढे महाविद्यालयात भौतिकशास्त्र हा विषय घेऊन मी पदवीधर झाले आणि त्यातच नंतर द्विपदवीधरही झाले.

भौतिकशास्त्र हा विषय खरं तर किचकट… पण मला का कुणास ठाऊक, त्यात खूप रस होता. त्यामुळे द्विपदवीधर झाल्यानंतर एका महाविद्यालयात अध्यापिका (प्राध्यापिका) म्हणून रुजू झाले. मराठी वाचनाची आवड होतीच, त्यामुळे भौतिकशास्त्रासारखा कठीण विषयही मी मुलांना छानपैकी सोपा करून शिकवू शकते. तब्बल ३५ वर्षांच्या कारकीर्दीनंतर एस.आय.ई.एस. कॉलेजच्या उपप्राचार्य पदावरून निवृत्त झाले आणि माझ्या मनाची कवाडे मी खुली केली. आता मला जे वाटते ते मी करायला मोकळी होते ना… मग माझा मनातच राहिलेला वाचनाचा छंद जोपासला. लिहीत गेले तसतशा अनेक मासिकांमधून माझ्या असंख्य कथा प्रकाशित झाल्या. अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागले. त्यातल्या सहभागातून मला असंख्य पारितोषिकेही मिळविली. २०१४ साली ‘मैत्रेय’ या शीर्षकाचा माझा कथासंग्रह प्रकाशित झाला. आपल्याला एखादा छंद असेल तर जीवनातील कठीण प्रसंगांमध्येही आपल्याला धीर मिळतो हे माझे म्हणणे आहे. मला शिवणकाम व वीणकाम हे छंद आहेत.माझ्या कुटुंबीयांचे यात मला खूप मोठे प्रोत्साहन मिळते.

प्रत्येकीचं स्वतःचं असं वेगळेपण असतं. आपलं करीयर, छंद, घर, संसार, नवरा, मुलंबाळं… या सार्‍यांच्या पलीकडे… फक्त ते गवसणं आवश्यक असतं. अंतर्मुख होऊन थोडा स्वतःच शोध घेतला की ते वेगळेपण सापडतं. तुमच्यातील हे वेगळेपण शोधायला ‘श्रीमती’ही तुमच्या मदतीला आली आहे. चला तर मग… लेखणी उचला आणि तुमच्या स्वतःतील वेगळेपण फोटोसहित आम्हालाही कळवा. वेगळ्या वेगळेपणास नावासहित प्रसिद्धी मिळेल. 

आमचा पत्ता : श्रीमती, शेवटचे पान, सद्गुरू दर्शन, नागू सयाजी वाडी, दै. ‘सामना’ मार्ग, प्रभादेवी, मुंबई- ४०००२५ किंवा [email protected] या ईमेलवरही पाठवता येईल.