
रेणापूर तालूक्यातील मौजे सिंधगाव येथे शेतात खळे करीत असताना अचानक येऊन धक्काबुक्की करुन गव्हाचे 60 किलो वजनाचे 28 हजार रुपये किमतीचे 12 कट्टे गहू पळवून नेण्यात आले. या प्रकरणी तब्बल 20 जणांविरुद्ध रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेबुब ईब्राहिम शेख रा. सिंधगाव यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, 12 मार्च रोजी दुपारी 1 वाजता ते आपल्या कुटुंबीयांसह आणि मजूरांसह शेतात गव्हाचे खळे करीत होते. अचानक एम.एच. 24 बी 6615 या टेम्पोमधून तसेच काही मोटारसायकलवरून 20 जण त्या ठिकाणी आले. त्यांनी धक्काबुक्की केली आणि खळ्यावरून सर्वांना बाजूला केले.
यामध्ये जमिन विक्री करणाऱ्या कुशाबाई गवळी यांची दोन मुले दिगंबर आणि दत्ता गवळी यांचा समावेश होता. टेम्पो चालवणारा प्रकाश हा त्यांचा जावई आहे. त्यांनी काठीने जीवे मारण्याची धमकी दिली आणि गव्हाचे 60 किलो वजनाचे आणि अंदाजे 28 हजार रुपये किमतीचे 12 कट्टे टेम्पोमध्ये भरून नेले. रेणापूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी भादवि 395 अन्वये दिगंबर भागवत गवळी, दत्ता भागवत गवळी, प्रकाश टेम्पो चालक, शिवाजी अश्रुबा गवळी, ऋषीकेश गवळी यांच्यासह 20 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





























































