
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे़. मृत्यूचे प्रमाणही वाढल्याने प्रशासनाने लॉकडाऊन अधिक कडक करण्यात आला आहे़. अत्यावश्यक सेवेतील दुकाने बंद ठेवत त्यांना केवळ होम डिलीव्हरीवर भर देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मेडिकल स्टोअर्समधील कर्मचाऱ्यांना आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. जेणेकरुन कोरोनाची साखळी तोडून रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात 522 कोरोनाबाधित रुग्ण सापडले. दोन दिवसांमध्ये रुग्णांची आकडेवारी हजारांच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले असून कोरोनाचा प्रसार असाच सुरू राहिला तर रुग्णांची संख्या आटोक्याच्या बाहेर जाईल. याकरीता जिल्हा प्रशासनाने आजपासून दुकानदारांना कडक निर्बंध लागू केले आहेत. दुकाने बंद ठेवून होम डिलीव्हरीवर भर देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये किराणा दुकानाचाही समावेश आहे. मेडिकल दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरटीपीसीआर टेस्ट करणे बंधनकारक करण्यात आले आहे़. शुक्रवारी सकाळपासून जिल्ह्यात कडक निर्बंध लावल्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट होता़. सर्वच तालुक्यात कडक निर्बंधांचे पालन करण्यात आले़.
रत्नागिरी नगरपरिषदेचे कोविड सेंटर सुरु
रत्नागिरी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत असल्यामुळे रत्नागिरी नगरपरिषदेनेही नगरपरिषदेच्या रुग्णालयात कोविड सेंटर सुरु केले आहे़. या कोविड सेंटरमध्ये 25 बेडची व्यवस्था करण्यात आली असून डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांचे नियोजन सुरु असल्याची माहिती नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी दिली़.





















































