परतीच्या पावसाने स्ट्रॉबेरी उत्पादक सुखावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या महिन्यात जावली, महाबळेश्वसह सर्वदूर चांगला पाऊस झाला. यामुळे पिकांना जीवदान मिळाल्यामुळे बळीराजा सुखावला. विशेषतः सातारा जिह्यातील वाई, जावली, महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱयांना मोठा दिलासा मिळाला. कारण पावसाने ओढ दिल्याने स्ट्रॉबेरीचे पीक धोक्यात आले होते. मात्र, परतीच्या पावसामुळे स्ट्रॉबेरीच्या पिकाला जीवदान मिळाले आहे. स्ट्रॉबेरीच्या उत्पादित रोपांना चांगला दर मिळाल्याने शेतकऱयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

वाई, जावली व महाबळेश्वर तालुक्यांत घेतल्या जाणाऱया स्ट्रॉबेरीला परतीच्या जोरदार पावसाने जीवदान मिळाले आहे. खर्चिक पीक म्हणून ओळखले जाणारे स्ट्रॉबेरी पीक व स्ट्रॉबेरीचे मदर प्लाण्ट्स पावसाने ओढ दिल्याने धोक्यात आले होते. गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकरी आर्थिक संकटातून बाहेर येत नाही तोच यंदा पावसाने ओढ दिल्याने पुन्हा आर्थिक संकटात सापडले होते. परंतु परतीच्या पावासाने शेतकऱयांना दिलासा मिळाला आहे.

मदर प्लाण्ट्सच्या माध्यमातून निर्माण होणाऱया स्ट्रॉबेरीच्या रोपांना चांगल्या पद्धतीने उभारी मिळत असून, त्यांना चांगला दरदेखील मिळाला आहे. त्याचप्रमाणे स्ट्रॉबेरी लागवडीलाही उभारी मिळत असून, चांगला दरही मिळला आहे. मदर प्लाण्ट्समधून दर्जेदार रोपे निर्माण झाल्याने शेतकऱयांनी आता दुसऱया टप्प्यातील स्ट्रॉबेरी लागवडीची लगबग सुरू झाली आहे.

पाऊसमानाच्या काळात महाराष्ट्रातील धुवाँधार पावसाचे प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱया जावली, महाबळेश्वर व वाई तालुक्यांत पावसाने पाठ फिरविली होती. मात्र, सप्टेंबर महिन्याच्या दुसऱया आठवडय़ात राज्यातील अनेक ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाली. तसेच सातरा जिह्यातील जावली, महाबळेश्वर व पाटण तालुक्यांतही चांगला पाऊस झाला. त्यामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले व बागायती पिकांना जीवदान मिळाले.

दुसऱया टप्प्यातील लागवड सुरू

n महाबळेश्वर तालुक्यात स्ट्रॉबेरी लागवडीला सुरुवात झाली आहे. आपल्या शेतामध्ये विविध जातींच्या स्ट्रॉबेरीच्या रोपांची लागवड करण्यात शेतकरी व्यस्त झाला आहे. लागवडीनंतर दिवाळीच्या पहिल्याच आठवडय़ात लावलेल्या रोपांना स्ट्रॉबेरीची फळधारणा होते. त्यानंतर हे स्ट्रॉबेरीचे फळ विक्रीसाठी बाजारात दाखल होते. पहिल्याच स्ट्रॉबेरीच्या हंगामाला चांगला दर मिळाल्याने शेतकऱयांचे आर्थिक उत्पन्नदेखील वाढते. त्यामुळे या वर्षी स्ट्रॉबेरीच्या उत्पादित झालेला रोपांनादेखील चांगला दर मिळाला आहे आणि आता अपेक्षेप्रमाणे यावेळी स्ट्रॉबेरीच्या फळांनादेखील चांगला दर्जेदार दर मिळेल, अशी अपेक्षा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱयांकडून व्यक्त होत आहे.