दखल – प्रतिभेच्या नभातील काव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अस्मिता येंडे

कवी अर्चिस जोशी आणि कविता हे समीकरणही तसेच आहे. आपल्या मनाच्या गाभाऱयात निर्माण होणाऱया भावतरंगांना आपल्या प्रतिभेने आणि शब्दसुमनांनी सजवून रसिकांच्या समोर आणले आहे, आपल्या नव्याकोऱया काव्यसंग्रहाच्या स्वरूपात!

कवी अर्चिस जोशी रचित ‘निरभ्र’ हा काव्यसंग्रह जगण्यातील संदर्भमूल्य अधोरेखित करणारा आहे. या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून जीवनातील अनेक चढ-उतार, विचारांची रचना आणि गती तसेच बदलता दृष्टिकोन, जगण्यातील एकाकी वृत्ती किंवा तशी वाढीस लागलेली भावना, सोबतच प्रीतीचा हळूवार स्पर्श अशा मानवी मनाच्या केंद्रस्थानी असणाऱया घटकांना कवितेच्या प्रांगणात प्रकाशमान केले आहे.

शारदा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘निरभ्र’ या काव्यसंग्रहात हिंदी आणि मराठी कविता समाविष्ट असून हिंदी विभागात 11 तसेच मराठी विभागात 16 कविता आहेत. हिंदी आणि मराठी भाषेचा फरक असला तरी व्यक्त होणारा भाव समान आहे. मुक्तछंदातील ह्या कविता अधिक उत्कट आणि प्रवाही आहेत. स्वच्छ, सुंदर आकाश जसे भासते निरभ्र, तसेच कवीचे अंत:करण निर्मळ, नितल आणि पारदर्शक आहे. त्यामुळे कवितेत तीच निरभ्रता पसरली आहे. आणि म्हणूनच या काव्यसंग्रहाचे शीर्षक अगदी यथार्थ आहे.

कवितेच्या क्षमतेविषयी व. पु. म्हणतात, ‘अति उत्कट असं काही असतं तेव्हा, कविताच ती उत्कटता पेलून धरू शकते असं कायम वाटतं.’ आणि ती उत्कटता कवी अर्चिस जोशी यांनी संयतपणे मांडली आहे, हे विशेष. एकूणच काव्यवाचनात रमणाऱया प्रत्येकाला ‘निरभ्र’ हा कवितासंग्रह अंतर्मनातून साद घालणारा आहे.

निरभ्र – कवितासंग्रह
कवी – अर्चिस जोशी
प्रकाशक : शारदा प्रकाशन
मूल्य : 200/- रुपये