
>> सुधाकर वसईकर
पहिल्या ‘अहवाल’ गझलसंग्रहाला रसिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्यानंतर तब्बल साडेचार वर्षांनी सुरेश भट यांच्या समृद्ध गझल परंपरेचा वारसा पुढे नेणारा ‘विजांचा सोयरा’ हा गझलकार प्रशांत वैद्य यांचा दुसरा संग्रह महाजन पब्लिकेशनने प्रसिद्ध केला आहे. प्रशांत वैद्य यांनी महाराष्ट्रभर गझलेचा प्रचार आणि प्रसार केला. अनेक लिहित्या हातांना गझलेच्या प्रवाहात आणण्याचे महत्त्कार्य केले असून अजूनही करीत आहेत. यास्तव मराठी गझलेत येणाऱया प्रत्येक नव्या पिढीस हा गझलसंग्रह विनम्रतापूर्वक अर्पण केलाय. एकूण 90 गझलांमधून जवळ जवळ पाचशे अस्सल, अव्वल आणि धारदार शेर ‘विजांचा सोयरा’ संग्रहात वाचकांस ‘काव्यात्म’चा सुखद अनुभव देतात. सडेतोड, परखड आणि मिश्कीलपणा हा प्रत्येक रचनेत पुरेपूर उतरला आहे.
‘अशासाठी न भ्यालो मी ढगांच्या गडगडाटाला
विजांचा सोयरा झालो विजा चमकायच्या आधी’
घाबरलात तरी संकट कोसळणारच आहे. मुकाबला करण्यासाठी तुमची अस्त्र्ां, शस्त्र्ां तयार ठेवलीत तर कशाचीच भीती उरत नाही. येणाऱया संकटाचा सामना सहज करता येतो असा आशावाद पेरणारा शेर मनात धैर्य निर्माण करून जातो.
‘जे मनास पटते ते ते बिनधास्त बोलतो लिहितो
वर्तनास माझ्या दांभिक लाचारी वंगण नाही
ब्रिटिशांच्या मागून आली स्वकीयांची ठेकेदारी
या देशाचे झालेले अजुनी लोकार्पण नाही…’
आपल्या अंतरीची सल बिनधास्त व्यक्त करताना आपल्या वागणुकीची पर्वा करत नाही. कारण तो लाचार तर नाहीच आणि उसने अवसानही घेत नाही. ब्रिटिशांची जुलमी राजवट तर गेली, पण त्यांच्यामागून आलेली स्वकीयांची राजवटदेखील लोकांना नीट जगू देत नाही. लोकशाही नावाला आहे. स्वातंत्र्य तर मिळालं. हुकमत हाती आली; पण ती मूठभर लोकांच्या!
‘आम्हीच खून केले शहरात पावसाचे
अन् हाय पंचनामे शेतात होत गेले…’
शहरी, महानगरी मानव इतका स्वार्थी आणि जुलमी झाला आहे की, सिमेंटचे जंगल उभारून पर्यावरणाचा समतोल बिघडवून त्याने एक प्रकारे पावसाचा खून केला आहे. त्याची झळ मात्र शेतकऱयाला बसलीय. नापिकीमुळे तो आत्महत्या करतोय. म्हणूनच गझलकार म्हणतोय, पावसाच्या खुनाचे पंचनामे शेतात होत गेले ही गझल रसिकाला अंतर्मुख करणारी आहे.
प्रशांत वैद्य यांचे खयाल, योजलेले प्रतीक, प्रतिमा आणि रूपक एक वेगळी गझलीयत पेश करतात. बऱयाचदा वरवर सोपी वाटणारी गझल त्यातील शेर पुनः पुन्हा वाचल्यावर वेगवेगळे अर्थ सांगून जातात. गहन आशय प्रतीत करतात. दोन ओळींमधील उपहासगर्भता, प्रतिमा – प्रतीके आणि रूपकांचे कल्पक उपयोजन गझलकाराची रचनेवरील उत्तम पकड ध्वनित करतात. गझलकाराला वाचणे एक वेगळी अनुभूती असते.
‘आता कळले काळजात धोकेही पिकले
गर्द मनाची आज कापणी केल्यानंतर….!’
उपरोक्त शेरातील खयालात दाद देण्याजोगा आहे. मनाला गर्दपणाची उपमा देऊन काळजात धोके पिकले. त्यामुळे मनाची कापणी करावी लागते आहे. शब्दांची नावीन्यपूर्ण उपयोजिता गझलकाराच्या संवेदनशील जाणिवेचे तरल प्रकटीकरण रसिकांच्या मनात हळवे तरंग उमटवून जाते.
‘प्रशांत’ नावाचा महासागर वरवर शांत भासत असला तरी त्याच्यातील ‘हकीम’ ( वैद्य ) वृत्तांतील रदीफ, काफिया आणि गझलीयत यांचा योग्य वापर करीत मनात निर्माण झालेली आंतरिक वादळे हळव्या शब्दांनी शमवू शकतो. समाजमन जागृत करू पाहतो.
जी गझल वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर रसिकाच्या कायम स्मरणात राहते आणि ज्या गझलेचा जनजीवनात नेहमीच प्रत्यय येतो, तीच यशस्वी गझल असते! अशी गझल आपल्याला कशी सुचली नाही, असा हेवा एखाद्या प्रतिभावंतास वाटावा. प्रत्येक रचनेतील अनुभव माझा आहे याची प्रचीती रसिकास येते तेव्हा ती गझल सरस ठरते. प्रशांत वैद्य यांच्या गझलेत हा प्रत्यय येतो. म्हणूनच त्यांची गझलीयत वाचकांस समृद्ध करणारी आहे. सहज बोलीभाषा आणि आशयगर्भ काव्य ही त्यांच्या गझलेची बलस्थाने आहेत. लय आणि नादमाधुर्य हे प्रभावी सादरीकरणास पूरक आहेत. प्रशांत वैद्य यांची गझल महाराष्ट्रात सर्वदूर आवर्जून वाचली आणि सादर केली जाते याचे ते गमक म्हणावे लागेल. हाच प्रत्यय ‘विजेचा सोयरा’तील गझल वाचल्यावरही येतो. जाणकार रसिकांनी आणि प्रत्येक नवोदित गझलकाराने हा गझलसंग्रह मिळवून वाचला पाहिजे. विविध वृत्तं आणि लयीत असणारे स्वयंभू शेर, सामाजिक-राजकीय-आर्थिक-सांस्कृतिक अशा अनेकविध विषयांवरील गझल मानवी जीवनातील सत्य सांगू पाहतेय. गझलकार जगण्याची दुखरी नस पकडू पाहतो आणि त्यात यशस्वी झाला आहे…आणि साहित्याचे हेच खरे प्रयोजन असले पाहिजे. सुयोग शारंग पंडित यांनी रेखाटलेलं अत्यंत सूचक असं मुखपृष्ठ लक्षवेधक झालंय.
विजांचा सोयरा
कवी /गझलकार : गुलजार
प्रकाशक : महाजन पब्लिशिंग हाऊस, पुणे
पृष्ठे :108, मूल्य : रुपये 150/-


























































