
>> डॉ. नागेश अंकुश
कविता हा अतिशय प्राचीन व मूलभूत असा वाङ्मय प्रकार मानला जातो. आजवरची कविता स्तोत्र, भूपाळी, अभंग, गाथा, सूक्त, आख्यान अन् प्रार्थनागीत अशा आध्यात्मिक अंगानंही बहरत विस्तारत गेलेली दिसते.
मराठीच्या उत्तम अभ्यासक असलेल्या अन् शुद्ध वाणीची देणगी लाभलेल्या प्रा. डॉ. वृंदा देशपांडे-जोशी याची ‘अंतर्नाद’मधील कविताही एक प्रगल्भ अध्यात्म जाणिवा व्यक्त करताना दिसते.त्यांचा ‘गंमत-जंमत’ हा दुसरा कवितासंग्रह. हे शीर्षक वाचताच वाचकांसमोर बालकांचं त्या भोवतालचं संपन्न बालविश्व उभं राहतं.
हे दोन्ही कवितासंग्रह समकालीन कवितेत आपली स्वतंत्र वेगळी नाममुद्रा उमटवताना दिसतात. नवी आशयसूत्रे घेऊन प्रकटतात अथवा आयुष्याचा जरतारी ‘काठ’ यातून आयुष्याचं मोल उलगडतात. तर, ‘नात्यांतला गोडवा’ यात छान असं सूत्रंही मांडतात. कशासाठी तू-तू, मी-मी, कशासाठी आटापिटा, जगायचं ज्याला असतं त्याला गवसतात हजार वाटा. यातून नात्यांकडे पाहण्याची एक प्रगल्भ समंजस दृष्टी दिसून येते.
समग्र कवितांमध्ये कुठेही ‘मी’ नाही, बडिवार नाही अन् नाही कोणताच अभिनिवेश. अंतर्नाद म्हणजे चिंतन-मननातून आयुष्याकडे सकारात्मक भूमिकेतून पाहताना गवसलेलं सुंदर सूत्र. विनम्र वृत्तीनं – प्रगल्भ जाणिवेने अंतरात्म्याशी साधलेला एक सुंदर संवाद होय. आध्यात्माची उत्कट बैठक सात्त्विकतेची प्रांजळ ओढ, शब्दांमधला सच्चेपणा, संस्कारक्षम अन् सूक्ष्म निरीक्षण-संवेदनशीलता ही या कवितांची ठळक गुणवैशिष्टय़े.
‘पाठराखण’मध्ये ज्येष्ठ कवी लक्ष्मीकांत तांबोळी लिहितात, मराठी कवितेत प्रार्थनेसाठी आध्यात्मिक पाट मांडून ठेवलेली ही कविता म्हणजे आत्ममनाची स्पदनं होय. ही कविता जागृतीचा ध्यास मांडणारी आहे. जीवनाकडे नव्या वेगळय़ा दृष्टीने पाहायला लावणारी ही आश्वासक कविता आहे, एवढं नक्की. या नव्या कवितेचं वाचक नक्कीच स्वागत करतील ही खात्री वाटते.
अंतर्नाद व गंमत-जंमत
प्रकाशक – वेदांतश्री प्रकाशन, पुणे
अनुक्रमे पृष्ठs – 80 व 24
किमंत -125 व 40 रुपये





























































