‘एमसीए’ निवडणुकीत पवार-शेलार गटाचे पारडे जड; 20 ऑक्टोबरला मतदान, निकाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई क्रिकेट असोसिएशनची 20 ऑक्टोबर रोजी निवडणूक होत असून या निवडणुकीत शरद पवार-आशीष शेलार यांच्या पॅनलचे पारडे जड असल्याचे चित्र आहे. या निवडणुकीत मुंबई क्रिकेट पॅनल आणि बाळ महाडदळकर पॅनल अशी आणखी दोन पॅनल्स रिंगणात उतरल्याने ही निवडणूक अधिकच चुरशीची होणार असा क्रिकेट जाणकारांचा अंदाज आहे.

एएमसीए निवडणुकीत अध्यक्षपदासाठी शरद पवार-आशीष शेलार गटाचे उमेदवार आशीष शेलार यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्याने आता अध्यक्षपदासाठी पवार-शेलार  गटाचे अमोल काळे आणि मुंबई क्रिकेट गटाचे प्रमुख माजी कसोटीपटू संदीप पाटील यांच्यात थेट लढत होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाविकास आघाडीचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सचिव व शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर हे एमसीए ऍपेक्स कौन्सिल सदस्यपदाची निवडणूक पवार-शेलार गटामधून लढवत आहेत. मानद सचिव पदासाठी अजिंक्य सुधीर नाईक, नील सावंत आणि मयांक खांडवाला हे तीन उमेदवार रिंगणात आहेत, तर कोषाध्यक्ष पदासाठी जगदीश आचरेकर (मुंबई क्रिकेट गट), संजीव खानोलकर (बाळ महाडदळकर गट) आणि अरमान मलिक (पवार-शेलार गट) यांच्यात तिरंगी लढत रंगणार आहे. एमसीए ऍपेक्स कौन्सिल सदस्यपदासाठीच्या 7 जागांसाठी एकूण 23 उमेदवार रिंगणात आहेत.

पवार–शेलार गटाचा विजय निश्चित

शरद पवार यांनी एमसीए निवडणुकीच्या संदर्भात एमसीए सभागृहात  बोलावलेल्या तातडीच्या बैठकीत 200 पेक्षा अधिक सदस्यांच्या उपस्थितीने निवडणुकीचा सारा माहौलच पालटवून टाकला. मुंबई क्रिकेटच्या विकासासाठी राजकारण बाजूला सारून राजकीय क्षेत्रातील लिजंड आणि जायंट एकत्र निवडणूक लढवत असल्याचे कळताच साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या, पण निवडणुकीच्या आधी आज बोलावलेल्या बैठकीला किती एमसीए सदस्य उपस्थित राहतील, याबाबत निश्चितपणे कुणालाच कल्पना नव्हती. मात्र पवारांच्या बोलावण्यानंतर काही तासांतच आज रात्री झालेल्या बैठकीला 200 पेक्षा अधिक सदस्यांची उपस्थिती स्फूर्तिदायक होती. या उपस्थितीमुळे पवार-शेलार गटात उत्साह संचारला असून या गटाचा विजय आतापासूनच निश्चित मानला जात आहे. आजच्या बैठकीत पवार यांनी आपल्या संपूर्ण गटाला शुभेच्छा दिल्या. तसेच आपला गट जिंकून आल्यावर एमसीएच्या सर्व सदस्यांना गरवारे क्लबचे सदा सदस्यत्वही दिले जाणार असल्याचे आश्वासन आशीष शेलार यांनी दिले आहे. या बैठकीला पवारांसह मुंबई भाजपा अध्यक्ष आशीष शेलार,  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जीतेंद्र आव्हाड, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आणि अमोल काळे उपस्थित होते.

नार्वेकर यांचा विजय निश्चित

ऍपेक्स कौन्सिल सदस्यपदासाठी शिवसेना सचिव आणि मुंबई टी-20 गव्हर्निंग कौन्सिलचे माजी चेअरमन मिलिंद नार्वेकर पवार-शेलार गटातून निवडणूक लढवत असून त्यांचे पारडे जड मानले जात आहे. मुंबई टी-20 गव्हार्ंनग कौन्सिलच्या माध्यमातून मुंबईतील युवा क्रिकेटपटूंना राष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी मिळावी यासाठी नार्वेकर यांनी केलेल्या धडाडीच्या कार्यामुळे ते मोठय़ा मताधिक्याने जिंकतील, असे अंदाज एमसीएचे विद्यमान मतदारच नोंदवत आहेत.  मुंबई क्रिकेटच्या भल्यासाठी पवार-शेलार गटाच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करा, असे आवाहन आशीष शेलार यांनी केले आहे.