
सिंगापूरमध्ये किडनी प्रत्यारोपणानंतर आरजेडीचे प्रमुख लालू प्रसाद यादव हिंदुस्थानात परतत आहेत. शनिवारी ते सिंगापूरहून दिल्लीत येत आहेत. लालू प्रसाद हे हिंदुस्थानात परतत असल्याची बातमी त्यांची कन्या रोहिणी आचार्य यांनी ट्विट करून दिली आहे. रोहिणी यांनी लोकांना भावनिक आवाहन करत लालू प्रसाद यांची काळजी घेण्यास सांगितले आहे.
लालूप्रसाद यादव यांच्यावर 5 डिसेंबर रोजी सिंगापूरच्या माउंट एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये किडनी प्रत्यारोपण करण्यात आले. त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. मुलगी रोहिणी आचार्य हिने तिची एक किडनी वडील यादव यांना दिली होती.
रोहिणी यांनी ट्विटमध्ये लिहिले की, ”तुम्हा सर्वांना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. आमचे नेते आदरणीय लालूजी 11 फेब्रुवारीला सिंगापूरहून हिंदुस्थानात येणार आहेत. मुलगी म्हणून मी माझे कर्तव्य बजावत आहे. माझ्या वडिलांना निरोगी केल्यानंतर मी त्यांना तुमच्या सर्वांमध्ये पाठवत आहे… आता तुम्ही लोक माझ्या वडिलांची काळजी घ्याल.”
लालू प्रसाद हिंदुस्थानात परतणार असल्याची चर्चा आधीपासूनच होती. सिंगापूरमध्ये लालू प्रसाद यादव यांची भेट घेतल्यानंतर आरजेडीच्या काही नेत्यांनी लालू फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात हिंदुस्थानात परतणार असल्याची माहिती दिली होती. रोहिणी आचार्य यांनी ट्विट करून याची पुष्टी केली आहे. लालू यादव मायदेशी परतल्याच्या वृत्तामुळे त्यांचे समर्थक आणि राजद नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे.




























































