राजद आमदाराने मसूद अजहरला म्हटले ‘साहेब’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पाटणा

पुलवामा हल्ल्याचा मास्टर माईंड व जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर याला राष्ट्रीय जनता दलाचे आमदार हाजी सुभान यांनी ‘साहेब’ म्हटले आहे. बिहारमधील किशनगंज येथे एका सभेत सुभान यांनी हे वक्तव्य केले असून त्यावेळी राजदचे नेते तेजस्वी यादव देखील व्यासपीठावर उपस्थित होते.

हाजी सुभान हे पंतप्रधान नरेंद्र मोदीवर टीका करत असताना त्यांनी मसूद अजहरला साहेब म्हटले. ‘मसूद अजहर साहेबांना आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित करण्याच्या बाबतीत चीनने वीटोचा वापर केला. त्यामुळे मसूद आंतरराष्ट्रीय आतंकवादांच्या यादीत नाही आला. चीनवाले बोलतात मसूद आतंकवादी नाही. मला कुणी सांगेल की याबाबत व चीनविरोधात मोदी एक चकार शब्दही का काढत नाही. दरवर्षी हिंदुस्थानमुळे चीनला मिळणाऱ्या 50 हजार कोटींच्या नफ्याविषयी सांगितले आहे का?सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यासाठी चीनने तीन हजार कोटी रुपये दिले आहेत. त्यामुळे मोदी चीनविरोधात काहीच बोलत नाही. ते फक्त त्यांच्याच विरोधात बोलतात ज्यांच्यात दम नाही. पाकिस्तानची लोकसंख्या फक्त 22 कोटी आहे. तितकी लोकं आपल्या उत्तर प्रदेशमध्ये राहतात. पाकिस्तानला उध्वस्त करायला आपल्याला फक्त एक तास लागेल. मोदी सतत पाकिस्तान बद्दल बोलत असतात. पण चीन आपली अडवणूक करतोय त्यामुळे चीनबद्दल बोला , असे आवाहन हाजी सुभान यांनी यावेळी केले.