
वाढदिवसाच्या पार्टीच्या नावाखाली चेन्नईच्या संगीतकाराला दारूतून गुंगीचे औषध देऊन लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अमृता धनोआ, डोना सुजितकुमार सिंग आणि एका तरुणाला अंबोली पोलिसांनी अटक केली. त्या तिघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
तक्रारदार हे चेन्नई येथील रहिवासी असून दीड वर्षांपूर्वी तक्रारदार त्यांची ओळख अमृताशी झाली होती. गेल्या आठवडय़ात तक्रारदार हे मुंबईत आले होते. 31 मे रोजी त्यांचा वाढदिवस असल्याने त्याची पार्टी देऊ असे अमृताने त्याला सांगितले. त्यानुसार त्यांची अंधेरीच्या यशराज स्टुडिओजवळ भेट झाली. गाडीत बसल्यानंतर तक्रारदार हे बेशुद्ध झाले. यावेळी तिघांनी तक्रारदाराचा मोबाईल, दागिने काढून घेतले. त्यानंतर तक्रारदार यांना जुहू येथे सोडले. दागिने चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर तक्रारदार याने अंबोली पोलीस ठाण्यात धाव घेतली. अंबोली पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. वरिष्ठ निरीक्षक बंडोपंत बनसोडे यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक नीलेश पाटील, ठाणगे, मस्कर यांनी तपास करीत अमृतासह तिघांना अटक केली.






























































