
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून भाजपचे नेते सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करत आहेत. तसेच अजित पवारांच्या गटातील नेतेही शरद पवारांवर टीका करत आहेत. शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्या भाजप आणि अजित पवार गटातील नेत्यांवर रोहित पवार यांनी पलटवार केला आहे. शरद पवारांचं कुटुंब आणि राष्ट्रवादी पक्ष फूटण्यास भाजप जबाबदार असल्याचा आरोपही रोहित पवार यांनी यावेळी केला आहे.
रोहित पवार म्हणाले की, भाजपची राजकीय खेळी शरद पवारांनी जुमानली नाही. भाजपने शिवसेनेचा शिंद गट फोडला आणि त्यांच्यात वाद निर्माण केला. या दोघांमध्ये वाद लावून भाजप नेते निवांत एसी रूममध्ये बसून हा सगळा तमाशा बघत बसले होते. राष्ट्रवादीसोबतही त्यांनी तेच केले. मात्र, शरद पवारांना 60 वर्षांचा राजकीय अनुभव आहे. त्यांनी भाजपची ही खेळी जुमानली नाही, असे रोहित पवार म्हणाले.
शरद पवारांचा राजकीय अनुभव मोठा आहे. अशी खेळी भाजप शरद पवारांसमोर खेळत असतील तर शरद पवार हे राजकीय दृष्टीकोनातून भाजपचे बाप आहेत. सध्या अशी परिस्थिती आहे की भाजपला काय पाहिजे हे शरद पवारांना चांगलेच माहिती आहे. भाजपला जे पाहिजे ते शरद पवार त्यांना देत नाहीत त्यामुळे त्यांची अडचण झाली आहे. भाजप शरद पवार यांचे कुटुंब आणि पक्ष फोडण्यासाठी जबाबदार आहे. त्यामुळे भाजपबद्दल काय बोलायचे, असा सवाल करत त्यांनी टीका करणाऱ्यांची बोलती बंद केली आहे.