
पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून सध्या मिंधे गटाचे रविंद्र धंगेकर हे सातत्याने भाजपवर टीका करत आहेत. त्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविंद्र धंगेकर यांना भाजपसोबत वाद न घालण्याची समज दिली आहे. कोणत्याही कारणावरून महायुतीत वाद नको असे त्यांनी धंगेकरांना सांगितले आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मिंध्यांना टोला लगावला आहे.
”महायुतीत दंगा नको ही तिन्ही राज्यकर्त्यांची भूमिका आहे, गुंडांकडून पुण्याची राखरांगोळी झाली तरी चालेल पण महायुतीत दंगा नको ही तिन्ही राज्यकर्त्यांची भूमिका आहे. सुलतान मिर्झाने गुंडांमध्ये कशी मुंबई वाटली तसंच पुणे देखील या तिन्ही पक्षांनी वाटून घेतले आहे. सीपी भाजपच्या पसंतीचा, मनपा आयुक्त शिंदे गटाच्या पसंतीचा तर कलेक्टर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पसंतीचा अशी ही वाटणी आहे. वरिष्ठांचा आशिर्वाद, स्थानिक नेत्यांचे मार्गदर्शन आणि गुंडांचा उपयोग ही त्रिसूत्री वापरून पुण्याचे वाटोळे केल जात आहे. असो, केवळ सत्ता आणि सत्ता हेच उद्दिष्ट असलेल्या राज्यकर्त्यांकडून दुसरी अपेक्षा तरी करायची काय? असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.