
पूर्वीप्रमाणेच क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटसाठी एकच कर्णधार या धोरणावर हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) पोहचले आहे. त्यामुळे श्रीलंका दौऱयाआधी पुन्हा वन डे आणि टी-20 संघांपाठोपाठ टीम इंडियाच्या कसोटी संघाचे कर्णधारपदी ‘हिटमॅन’ रोहित शर्माकडे दिले जाणार असे विश्वसनीय वृत्त आहे. पुढच्या आठवडय़ात रोहितच्या नावावर कसोटी कर्णधार म्हणून शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने एका क्रीडा वेबसाइट्सशी बोलताना सांगितले की, मंडळाचे निवड समिती सदस्य, संघाचे प्रशिक्षक आणि खेळाडूंचा असा आग्रह आहे की रोहितकडेच टीम इंडियाच्या कसोटी संघाचे नेतृत्व सोपवले जावे. रोहितच्या कसोटी नेतृत्वावर श्रीलंका संघाविरुद्धच्या मालिकेपूर्वी शिक्कामोर्तब होईल असे संकेत आहेत.
रोहितच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडीजला ‘क्लीन स्वीप’
कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने सध्या हिंदुस्थान दौऱयावर आलेल्या वेस्ट इंडीज संघाला तीन वन डे लढतींच्या मालिकेत 3-0 असे पराभूत करीत मालिकेत विजयाची ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’ नोंदवली होती. टीम इंडियाला 39 वर्षांनंतर विंडीजला मालिकेत ‘क्लीन स्वीप’ देण्याचा भीमपराक्रम साकारता आला आहे.
24 फेब्रुवारीपासून श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेला सुरुवात
बीसीसीआयने काल मंगळवारीच श्रीलंकेविरुद्धच्या क्रिकेट मालिकेचा कार्यक्रम घोषित केला आहे. हिंदुस्थान दौऱयावर येणारा श्रीलंकन क्रिकेट संघ यजमान हिंदुस्थानविरोधात तिन टी-20 लढती आणि दोन कसोटी लढतीची मालिका खेळणार आहे. पहिला टी-20 सामना 24 फेब्रुवारीला लखनौत तर दुसरा टी- 20 सामना 26 फेब्रुवारीला आणि तिसरा टी-20 सामनाही 27 फेब्रुवारीला धरमशाला येथेच खेळवला जाणार आहे. 4 ते 8 मार्च या कालावधीत मोहाली येथे श्रीलंकेविरुद्ध मोहाली, पंजाब येथे खेळवला जाणारा पहिला कसोटी सामना हा माजी कर्णधार विराट कोहलीचा कारकीर्दीतील 100 वा कसोटी सामना असेल. या सामन्यात टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्माच करणार आहे. दुसरा दिवसरात्र कसोटी सामना 12 ते 16 मार्च या कालावधीत बंगुळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
























































