
पोर्तुगालचा दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या शिरपेचात बुधवारी मध्यरात्री आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. 2022 सालामध्ये होणाऱया फिफा वर्ल्ड कप पात्रता फेरीच्या लढतीत पोर्तुगालचे प्रतिनिधित्व करताना ख्रिस्तियानो रोनाल्डो याने आयर्लंडविरुद्ध दोन गोल केले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक 111 गोल करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. याआधी इराणच्या अली देई याच्या नावावर सर्वाधिक 109 गोल करण्याचा विक्रम होता. ख्रिस्तियानो रोनाल्डो याने हा विक्रम मागे टाकला. या महान फुटबॉलपटूने 89 व 96 व्या मिनिटाला गोल करीत पोर्तुगालला विजय मिळवून दिला. पोर्तुगालने या लढतीत आयर्लंडला 2-1 अशा फरकाने पराभूत केले. अन्य लढतीत बोस्निया हर्झेगोविना संघाने वर्ल्ड चॅम्पियन फ्रान्सला 1-1 अशा बरोबरीत रोखले.
थेट पात्र ठरण्याची संधी
पोर्तुगालकडे फिफा वर्ल्ड कपमध्ये (2022) थेट पात्र ठरण्याची संधी असणार आहे. पात्रता फेरीत या संघाने चार सामन्यांमधून 10 गुणांची कमाई केली आहे. यापैकी तीन सामन्यांमध्ये पोर्तुगालने विजय मिळवले आहेत. एक लढत ड्रॉ राहिलीय. गट ‘ए’मध्ये पोर्तुगालचा संघ पहिल्या स्थानावर आहे. पण सर्बियाला अद्याप एक सामना खेळावयाचा आहे. सर्बियाने तीन सामन्यांमधून 7 गुणांची कमाई केलीय. गटातील उपविजेत्या संघाला प्ले ऑफमध्ये लढावे लागणार आहे. गटातील विजेत्या संघाला थेट वर्ल्ड कपच्या मुख्य फेरीत स्थान मिळणार आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक गोल करणारे –
नाव सामने गोल
ख्रिस्तियानो रोनाल्डो 180 111
अली देई 149 109
मोख्तार दहरी 142 89
फेरेंक पुसकास 85 84
गॉडफ्रे चितालू 111 79
हुसैन सईद 137 78
पेले 92 77
अली माबखाऊत 92 76
लियोनेल मेस्सी 151 76
पुनीशिगे कामामोटा 76 75
बशर अब्दुल्ला 134 75
सुनील छेत्री 118 74
फुटबॉल खेळण्याची इच्छा आजही कायम आहे. तसेच नुकताच मँचेस्टर युनायटेड या क्लबसोबत करार केल्याचा आनंद आहेच आणि आता पोर्तुगालसाठी खेळताना सर्वाधिक गोल करण्याचा मान संपादन करता आलाय. माझा आनंद गगनात मावेनासा झालाय.
– ख्रिस्तियानो रोनाल्डा





























































