कोविड पासच्या सक्तीमुळे दंगल, दंगलीदरम्यान झालेल्या गोळीबारात काही नागरीक जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

युरोपातील काही देशांत पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घालायला सुरुवात केली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी नेदरलँडने एक कायदा आणण्याचं ठरवलं आहे. या कायद्याला विरोध करत तिथली जनता रस्त्यावर उतरली आहे. रॉटरडॅम शहरात या प्रस्तावित कायद्याविरोधात उतरलेल्या लोकांनी शुक्रवारी तुफान जाळपोळ करत दंगल माजवली. दंगलखोरांनी पोलिसांवर दगडफेक केली आणि त्यांच्या गाड्याही जाळल्या. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला आणि दंगलखोरांवर पाण्याचे फवारे मारावे लागले. नेदरलँड सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस न घेतलेल्यांवर निर्बंध घालण्याबाबत विचार सुरू केला आहे. ज्या नागरिकांचे दोन्ही डोस झाले असतील त्यांना सरकार एक पास देणार आहे. ज्यांच्याकडे हा पास असेल त्यांना फार निर्बंध सहन करावे लागणार नाहीत. सरकारच्या याच निर्णयावर लस घेण्यास इच्छुक नसलेले संतापले आहेत.

शुक्रवारी रॉटरडॅममध्ये झालेल्या दंगलीत काहीजण जखमी झाले आहेत. एक व्हिडीओ व्हायरल झाला असून दंगलीदरम्यान एक माणूस गोळी लागल्याने जखमी झाल्याचे त्यात दिसत आहे. ही गोळी या माणसाला कशी लागली ती कोणी झाडली हे अजून कळू शकलेलं नाहीये. रॉटरडॅममधील परिस्थिती काहीशी नियंत्रणात आली असली तरी हे शहर अजूनही धुमसतंय. यामुळे पोलिसांनी तिथे मोठा फौजफाटा तैनात केला असून दंगलीप्रकरणी बऱ्याच जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. दंगलीदरम्यान आतापर्यंत 7 जण जखमी झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी दंगलीबद्दल माहिती देताना सांगितलं की दंगेखोरांनी जाळपोळ करायला सुरुवात केली, ज्यामुळे शहरातील मुख्य रेल्वे स्टेशन बंद करावं लागलं होतं.