
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणात वाल्मीक कराड सध्या बीडच्या तुरुंगात आहे. या तुरुंगात त्याचा राजेशाही थाट सुरू असून, त्याला स्पेशल ट्रिटमेंट देण्यात येत असल्याचा दावा बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले याने केला आहे. वाल्मीकला खायला फरसाण, चिकन आणि तेल लावलेल्या चपात्या देण्यात येत असल्याच्या त्याच्या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे.
संतोष देशमुख हत्येप्रकरणी जनरेटय़ामुळे पोलिसांनी आरोपींना अटक केली. कृष्णा आंधळे वगळता इतर सर्व आरोपी अटकेत आहेत. वाल्मीक कराड याला बीड कारागृहात ठेवण्यात आले आहे. मात्र त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात येत असल्याचा दावा कासले यांनी केला आहे. त्याला सर्व सोयी-सुविधा देण्यात आल्याचे कासलेने म्हटले आहे.
बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले हा जामिनावर सुटला आहे. बाहेर येताच त्याने शनिवारी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला. त्यात त्याने वाल्मीकला तुरुंगात सर्व सोयी-सुविधा मिळत असल्याचा दावा केला आहे. वाल्मीकला फरसाण, तेल लावलेल्या चपात्या, बुधवार आणि रविवारी चिकन दिले जात असल्याचा दावा कासले याने केला. त्याला नागपूर अथवा पुण्याच्या तुरुंगात हलवा. त्याच्या जीवाला बीड कारागृहात धोका असल्याचे त्याने म्हटले आहे. अंजली दमानिया, करुणा मुंडे, तृप्ती देसाई यांच्याकडे या विषयीची विनंती केल्याचे त्याने सांगितले. तुरुंगात गेल्यावर आपल्याला प्लॅस्टिकच्या कपात चहा देण्यात आला याची आठवण त्याने यावेळी करून दिली. यापूर्वी त्याला जिल्हा रुग्णालयात व्हीआयपी ट्रिटमेंट दिल्याच्या प्रकरणात पोलीस दलातील कर्मचाऱयांवर कारवाई झाली होती. आता येथील कर्मचाऱयांवर काय कारवाई होते याकडे जिह्याचे लक्ष लागले आहे.