
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबईत मेट्रो ३चं काम वेगानं सुरू असून त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे, असं चित्र एका बाजूला दिसत आहे. मात्र दुसऱ्या बाजूला त्याच वेळी मेट्रोच्या कामाचा दर्जा नगण्यच बाब बनली आहे. कारण मेट्रोच्या कामाचा दर्जा तपासण्यासाठी स्वतंत्र लॅबच नसल्याची माहिती समोर आली आहे.
एका इंग्रजी संकेतस्थळाने हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे. मुंबईतील माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली, यांनी मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाकडे (एमएमआरसी) मागवलेल्या एका माहितीमध्ये ही गंभीर बाब समोर आली आहे. मेट्रोच्या बांधकामासाठी वापरला जाणारा कल्ला माल, खासगी प्रयोगशाळेकडून तपासून घेतला जातो. मात्र एवढ्या महत्वाच्या कामासाठी एमएमआरसीची स्वतंत्र प्रयोगशाळा आवश्यक आहे, ज्यामुळे कामाचा दर्जा उत्तम राखता येतो. पण अशी कोणतीही यंत्रणा एमएमआरसीकडे नाही.
एमएमआरसीचे जनसंपर्क अधिकारी आणि सल्लागार श्रीनिवास यांनी हे स्पष्ट केलं आहे की मेट्रोकडे आता अशा प्रकारची स्वतंत्र प्रयोगशाळा नाही. ही माहिती मिळाल्यानंतर गलगली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले आहे. यामध्ये मेट्रोच्या कामाचा दर्जा चांगला राहावा म्हणून अशा प्रकारची स्वतंत्र प्रयोगशाळा असणं गरजेचं आहे, असा स्पष्ट उल्लेख केला आहे. तसंच अन्य महत्वाच्या सुविधा देखील देणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.
राज्याच्या सार्वजनिक विभागानं सर्व जिल्ह्यांमध्ये तशी यंत्रणा उभारली आहे. मग एमएमआरसी आणि एमएमआरडीएकडे अशा प्रकारच्या मोठ्या प्रकल्पासाठी स्वतंत्र यंत्रणा का उभी केली नाही? असा प्रश्न देखील केला आहे.
दरम्यान, मेट्रो-३च्या कामासाठी आवश्यक अशी सर्व यंत्रणा आमच्याकडे आहे. तसेच बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या कच्च्या मालाची तपासणी जनरल कन्सल्टंटस् कडून करण्यात येते, जी अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज आहे, असं एमएमआरसीचे प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.




























































