
>> गणेश आचवल
सध्या कलर्स मराठीवर सुरू असलेली ‘शेतकरीच नवरा हवा’ ही मालिका वेगळय़ा विषयामुळे चर्चेत आहे. यात ‘रेवा’ ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री म्हणजे ऋचा गायकवाड… एक प्रॉमिसिंग चेहरा.
ऋचा मुळात मुंबईची. तिची आई प्राध्यापिका आहे आणि तिचे वडील पोलीस अधिकारी आहेत. शाळेत असल्यापासूनच ऋचाला विविध स्पर्धेत भाग घेण्याची, विविध कलांची आवड होती. तिने ओडिसी नृत्याचे प्रशिक्षण घेतले आहे. गेली सोळा वर्षे ती एक उत्तम ओडिसी नृत्य सादर करणारी कलाकार आहे. तसेच गुरू माधुरी नाईक यांच्याकडून तिने गेली सात वर्षे गाण्याचे प्रशिक्षण घेतले आहे. तिला फ्युजन आणि शास्त्र्ााrय असे दोन्ही प्रकारचे संगीत सादर करायला आवडते. तिने पेंटिंगमध्ये बी. एफ. ए. ही पदवी मिळवली आहे. काही शॉर्ट फिल्म्समधून, काही नाटकांमधूनदेखील तिने काम केलं होतं. एक सौंदर्य स्पर्धा ऋचाचे आयुष्य बदलवणारी ठरली. त्या सौंदर्य स्पर्धेत विजयी झाल्यानंतर तिला ‘वज्र प्रॉडक्शन’कडून फोन आला आणि एका मालिकेसाठी ते ऑडिशन घेत आहेत, असे तिला कळले. प्रथम ऑनलाइन व्हिडीओ पाठवल्यावर तिला पुन्हा फोन आला आणि सातारा येथे ‘शेतकरीच नवरा हवा’ या मालिकेच्या ऑडिशनसाठी तिला बोलावले गेले आणि ती ऑडिशन झाल्यावर याच मालिकेतील ‘रेवा’ या प्रमुख व्यक्तिरेखेसाठी तिची निवड झाली.
ऋचा म्हणते, ‘‘मला ‘रेवा’ ही व्यक्तिरेखा साकारायला मिळत आहे, हे माझे भाग्य आहे. कारण हा माझा पहिला प्रोजेक्ट आहे. त्यामुळे एवढी मोठी भूमिका देताना ‘कलर्स मराठी’, ‘वज्र प्रॉडक्शन’ आणि आमची संपूर्ण टीम यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला, त्याबद्दल मी खूप आभारी आहे. मुळात या ‘रेवा’च्या भूमिकेत आणि माझ्या व्यक्तिमत्त्वात खूप साम्य आहे. कारण ‘रेवा’ जशी शहरी मुलगी आहे, आधुनिक संस्कृतीत वाढलेली आहे, तशीच मी पण मुंबईची आहे. मला गावातील वातावरणाची सवय नाही, त्यामुळे या मालिकेत गावातील वातावरण अनुभवताना मला खूप मजा येत आहे. मला या मालिकेचा विषय खूप आवडला कारण ‘शेतकरीच नवरा हवा’ या शीर्षकातच एक मेसेज आहे. शेतकऱयांमुळे आपण आहोत. या मालिकेच्या निमित्ताने मी सातारा येथील सोनगावातील जीवन अनुभवत आहे. गावातील कित्येक कामांची जशी ‘रेवा’ला सवय नाही, तशी मलाही नाही.
त्यामुळे ‘रेवा’ ही भूमिका साकारताना खूप गंमतीजमती घडतात आणि त्या उत्स्फूर्तपणे घडताना दिसतात. या मालिकेमुळे माझी जबाबदारी वाढली आहे, हे खरं आहे. मी आत्ता एमआयटी विद्यापीठातून पदवीच्या शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेत आहे. त्यांच्या मिळणाऱया सहकार्याचासुद्धा माझ्या यशात वाटा आहे.































































