सोशल मीडियावर अफवांचे पीक, मुले पळवणारा समजून रिक्षाचालकास मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभय मिरजकर । लातूर

‘लांडगा आला रे लांडगा आला ‘ या गोष्टीचा प्रत्यय सध्या लातूर जिल्ह्यात येत आहे. मुले पळवणारी टोळी आली असे मेसेज सोशल मीडियात धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे निष्पाप लोकांना प्रचंड मारहाण होत आहे. औसा तालूक्यातील बोरफळ येथे मारहाणीची एक घटना घडली तर दुसरी घटना हलगरा ता. निलंगा येथे घडली. हलगरा येथे तर लोकांनी पोलीस उशीरा आले म्हणून पोलीस गाडीवरही दगडफेक केली. रिक्षाचालकास मारहाण करुन रिक्षाही जाळून टाकली.

औसा तालूक्यातील बोरफळ येथे मुलं पळवण्याच्या अफवेतून बेदम मारहाणीची घटना घडली. प्रत्यक्षात नवरा-बायकोच्या भांडणातून झालेल्या प्रकारास मुले पळवणारी टोळी असे स्वरुप देऊन ही घटना घडली. सोशल मीडियात सुरू झालेली अफवा त्यास कारणीभूत ठरत आहे.

निलंगा तालूक्यातील मौजे हलगरा येथे तर एका रिक्षाचालकास बेदम मारहाण करण्यात आली. निलंगा येथून चिचोंडी, होसूरचे भाडे घेऊन तानाजी भगवान सोनवणे (वय ५५) जात होता. त्याला हलगरा येथे थांबवून लोकांनी बेदम मारहाण केली. मुले पळवण्याच्या अफवेतून ही घटना घडली. केवळ मारहाण करुनच लोक थांबले नाहीत तर त्याची रिक्षा काही क्षणात जाळून टाकली. पोलीस घटनास्थळी उशीरा आले म्हणून संतप्त लोकांनी पोलीस गाडीवरही दगडफेक केली. तानाजी सोनवणे याला प्रारंभी औरादशहाजनी येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. नंतर निलंगा उपजिल्हा दवाखान्यात दाखल केले तिथूनही पुढील उपचारासाठी लातूरला हलवण्यात आले. अफवा प्रकारात दोघांना जीव गमवावा लागण्याची वेळ लातुरात आली होती. पण त्यांचे दैव बलवान म्हणून ते वाचले. अन्यथा सोशल मीडियाचे बळी ठरले असते.