मालेगावात महिलांसह चौघांना मारहाण, पोलिसांवरही जमावाचा हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नाशिक

मुले पळविणारी टोळी असल्याच्या संशयावरून मालेगावातील अकबर दवाखान्याजवळ रविवारी रात्री जमावाने केलेल्या मारहाणीत परभणी जिह्यातील महिलांसह चारजण जखमी झाले. घटनास्थळी गेलेल्या पोलिसांवरही जमावाने दगडफेक केल्याने तणाव निर्माण झाला होता.

परभणी जिह्यातील जिंतूर तालुक्यातील धानोरा येथील गजानन साहेबराव गिरे (२७) हे पत्नी सिंधू, बहीण अनुसया व भाचा योगेश यांच्यासोबत मालेगाव येथून मूळगावी जाण्यासाठी पैसे नसल्याने अकबर दवाखान्याजवळ भीक मागत होते. तेथे आलेल्या सहा अनोळखी इसमांनी या सर्वांना मुले पळविणारे आहेत असे समजून लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. यात गजानन गिरे यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यांची पत्नी, बहीण व भाचाही जखमी झाला. यानंतर शेकडो नागरिक या ठिकाणी जमा झाले. माहिती समजताच आझादनगरचे पोलीस उपनिरीक्षक सागर नांद्रे अधिकारी, कर्मचाऱयांसह घटनास्थळी दाखल झाले. या जमावाने पोलिसांवरही दगडफेक केली त्यात काही पोलीस जखमी झाले असून, वाहनांचेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी गजानन गिरे यांच्या फिर्यादीवरून आझादनगर पोलीस ठाण्यात सहाजणांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अफवा मुले पळवणाऱ्या टोळीची

मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत

धुळे जिह्यातील साक्री तालुक्यातील राईनपाडा हत्याकांडातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी जाहीर केले. वणीजवळील सप्तशृंग गडावरील ‘फ्युनिक्युलर रोप-वे’च्या उद्घाटनानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली. त्यानंतर संध्याकाळी धुळे जिल्हाधिकारी रेखावार यांनी प्रत्येकी ५ लाख रुपयांचे धनादेश मृतांच्या नातेवाईकांनी दिले.

मृतदेह मंगळवेढय़ाकडे

पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदन-गृहातून पाच जणांचे मृतदेह खास गाडय़ांतून आज मंगळवेढय़ास नेण्यात आले.

नोकऱ्या द्या!

मृतांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च सरकारने करावा, सरकारी नोकरी द्यावी, नुकसानभरपाई म्हणून ४५ लाख रुपये द्या, जातीचे दाखले देण्यात यावेत अशा मागण्या मृतांच्या नातेवाईकांनी केल्या.

दीपक केसरकर यांच्याकडून सांत्वन

या पाच मृतांचे वारसदार हे पिंपळनेर गावाबाहेर उभारलेल्या राहुटय़ांमध्ये राहत आहेत. तेथे जाऊन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी या कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि त्यांना दिलासा दिला.