सामना अग्रलेख – महायुद्धाचा भयपट!

3588

 लादेन आणि इसिसचा प्रमुख अबू बक्र अल बगदादी यांचा खात्मा केल्यानंतर जगभरातून अमेरिकेला जो पाठिंबा मिळाला तसा सुलेमानीच्या हत्येनंतर मिळाला नाही. उलट एका सार्वभौम देशाच्या सैन्यप्रमुखाला ठार करण्याच्या महासत्तेच्या या कृत्यामुळे सारे जग अमेरिकेलाच युद्धखोर ठरवू लागले आहे. त्यामुळेच अमेरिका आणि इराणमध्ये उद्या संघर्ष भडकलाच तर जगात सरळ दोन गट पडतील आणि त्याचे रूपांतर तिसऱया महायुद्धात होईल असा जो भयपट मांडला जात आहे तसा कुठलाही धोका सध्या तरी दिसत नाही.

अमेरिका आणि इराणमध्ये संघर्षाची जी ठिणगी पडली आहे त्यामुळे जगभरातच सध्या चिंतेचे वातावरण आहे. एकीकडे आर्थिक व लष्करी या दोन्ही क्षेत्रांतील जागतिक महासत्ता आणि दुसरीकडे निम्म्या जगाला पेट्रोल-डिझेलचा पुरवठा करणारे तेलसंपन्न राष्ट्र. अशा दोन देशांमध्ये खुनी खेळ सुरू झाल्यामुळे जगभरात त्याचे पडसाद उमटणार हे साहजिकच. तसे ते दिसतही आहेत. तथापि, अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावातून लगेचच तिसऱ्या महायुद्धाचा भडका वगैरे उडण्याची कुठलीही शक्यता सध्या तरी दिसत नाही. तसे वातावरण आणि भय मात्र नक्कीच निर्माण केले जात आहे. अमेरिकेने बगदाद विमानतळाबाहेर हवाईहल्ला करून इराणचे सर्वोच्च सैन्य अधिकारी कासीम सुलेमानी यांची हत्या केल्यापासून उभय देशांतील तणाव शिगेला पोहचला आहे. परिस्थिती स्फोटक म्हणावी इतपत चिघळली आहे. त्यापाठोपाठ दोन दिवसांनी इराणनेही इराकमधील अमेरिकी तळांवर क्षेपणास्त्र डागून कळ काढणाऱ्या महासत्तेला त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले. अमेरिकेचे 80 सैनिक मारल्याचा दावा इराणने केला असला तरी अमेरिकेचा एकही सैनिक इराणच्या प्रतिहल्ल्यात जखमीही झाला नाही असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच आता स्पष्ट केले आहे.

हवाईहल्ल्यांची पूर्वसूचना देणाऱ्या यंत्रणेमुळे अमेरिकी सैनिकांचे प्राण वाचले हे खरे असले तरी सूडाने पेटलेला इराण पुन्हा असे हल्ले करणारच नाही याची शाश्वती कोणीच देऊ शकणार नाही. अर्थात, कुठलाही सार्वभौम देश आपल्या सेनापतीचा छिन्नविच्छिन्न झालेला मृतदेह शांतपणे कसा बघू शकेल? पुन्हा कमांडर सुलेमानी हे केवळ सैन्यप्रमुखच नव्हते, तर इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्लाह खोमेनी यांच्या अत्यंत मर्जीतील अधिकारी होते. खोमेनी यांच्यानंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाचे शक्तिशाली व्यक्तिमत्त्व असणाऱया सुलेमानी यांच्याकडे इराणची तमाम जनता भविष्यातील राष्ट्राध्यक्ष म्हणून पाहत होती. अमेरिकेला बहुधा तेच नको असावे. आखाती देश आणि एकूणच पश्चिम आशियात जिथे जिथे म्हणून अमेरिकेने हातपाय पसरण्याचा प्रयत्न केला तिथे तिथे महासत्तेच्या सैन्याला सळो की पळो करून सोडण्याचे काम सुलेमानी यांनी केले. इराक, सीरिया, येमेन यासारख्या देशांत डेरा घालून बसलेल्या अमेरिकी तळांवर जे जे हल्ले झाले त्यामागे सुलेमानीचेच डोके होते असा अमेरिकेचा संशय होता. तेच कमांडर सुलेमानी भविष्यात इराणचे राष्ट्राध्यक्ष झाले तर अमेरिकेसाठी मोठी डोकेदुखी ठरतील म्हणून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सुलेमानीस खतम करण्याचे फर्मान काढले. अमेरिकेला ते कुठल्याही परिस्थितीत नको होते. त्यातूनच 14 वर्षांपूर्वी इराणवर कठोर आर्थिक निर्बंध लादले गेले, इराणची विदेशी बँकांतील अब्जावधी डॉलर्सची रक्कम गोठवली गेली, इराणकडून तेल खरेदी करण्यावर बंदी घातली. इराणचे दररोज तीस हजार कोटी रुपयांचे नुकसान होऊ लागले. 2016 पर्यंत सलग 10 वर्षे हे निर्बंध सहन करूनही इराण मोडला नाही. त्याचे श्रेयही बव्हंशी कमांडर सुलेमानी यांनाच जाते.

नव्या इराणचा शिल्पकार असलेले सुलेमानी इराणी जनतेच्या गळय़ातील ताईतच बनले होते. अमेरिकेने सुलेमानी यांची हत्या केल्यानंतर त्यांच्या दफनविधीसाठी जो लाखोंचा जनसमुदाय लोटला तो यामुळेच. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी जरी सुलेमानीस दहशतवादी ठरवले असले तरी अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांसह जगातील एकाही देशाने सुलेमानी यांना दहशतवादी मानले नाही. त्यामुळेच लादेन आणि इसिसचा प्रमुख अबू बक्र अल बगदादी यांचा खात्मा केल्यानंतर जगभरातून अमेरिकेला जो पाठिंबा मिळाला तसा सुलेमानीच्या हत्येनंतर मिळाला नाही. उलट एका सार्वभौम देशाच्या सैन्यप्रमुखाला ठार करण्याच्या महासत्तेच्या या कृत्यामुळे सारे जग अमेरिकेलाच युद्धखोर ठरवू लागले आहे. त्यामुळेच अमेरिका आणि इराणमध्ये उद्या संघर्ष भडकलाच तर जगात सरळ दोन गट पडतील आणि त्याचे रूपांतर तिसऱया महायुद्धात होईल असा जो भयपट मांडला जात आहे तसा कुठलाही धोका सध्या तरी दिसत नाही.

सरहदों पर बहोत तनाव है क्या..?
कुछ पता तो करो, चुनाव है क्या..?

असे एका शायरने म्हटलेच आहे. अमेरिकेत यंदा राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक आहे आणि निवडणूक वर्षात युद्धज्वर निर्माण करण्याचा प्रयोग ट्रम्प यांनीही स्वीकारला एवढाच याचा अर्थ!

आपली प्रतिक्रिया द्या