सामना अग्रलेख – ब्रिटनचा आत्मघात!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनासोबत जगायला शिका, असा संदेश देऊन ब्रिटनच्या पंतप्रधानांनी संपूर्ण निर्बंध हटवण्याची घोषणा केली असली तरी कोरोनाचा समर्थपणे मुकाबला करण्यात यशस्वी ठरलेल्या न्यूझिलंडसारख्या देशाने मात्र या भूमिकेला विरोध केला आहे. एकीकडे कोरोनाचा नवीन डेल्टा व्हेरिएंट जगभरात धुमाकूळ घालतो आहे. त्यापाठोपाठ ‘लॅमडा’ नावाचा नवीन कोरोना विषाणू दक्षिण अमेरिकेत आढळला आहे. कोरोनाचा मूळ विषाणू आणि डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही ‘लॅमडा’ हा व्हेरिएंट अधिक प्राणघातक आहे. ब्रिटनमध्येही त्याचे काही रुग्ण आढळले आहेत. असे असतानाही मास्कसह सर्व निर्बंध हटवण्याचा ब्रिटनचा निर्णय आत्मघातकी ठरू शकतो.

जगभरात 40 लाखांहून अधिक बळी घेणाऱया कोरोना विषाणूने आता जगाच्या कानाकोपऱयात आपले बस्तान कायमचे बसवले आहे, असेच दिसते. कॅन्सर, क्षयरोग, हृदयरोग हे आजार जसे पृथ्वीतलावर कायम निवासी बनून राहिले आहेत, तसेच कोरोनाही कायमचा जाण्यासाठी आलेला दिसत नाही. कोरोनाचा विषाणू आपले गुणधर्म बदलून, नवनवीन रूप धारण करून वैद्यक शास्त्राला आणि विज्ञानाला गुंगारा देत आहे. लक्षणे बदलून नव्या स्वरूपात दाखल होतो आहे. त्यामुळे कोरोनाची भीती बाळगून जगरहाटी आणखी किती वर्षे बंद ठेवायची यावर आता जागतिक पातळीवर मंथन सुरू झाले आहे. त्यातूनच ‘कोरोनासोबत जगायला शिका’ हा विचार बळावताना दिसतो आहे. पण कोरोनासोबत जगायचे म्हणजे नेमके काय करायचे आणि कोरोनाने जगू दिले नाही तर काय करायचे, याविषयी मात्र कोणीच बोलत नाही. ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी तर 19 जुलैनंतर ब्रिटन पूर्णपणे ‘अनलॉक’ करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार ब्रिटनमधील सर्व व्यवहार आणि जनजीवन तर पूर्ववत सुरू होणार आहेच, पण त्यासोबतच मास्कचा वापर, सोशल डिस्टंसिंग वगैरे सर्व निर्बंधही संपुष्टात येणार आहेत. आश्चर्याची गोष्ट अशी की, ब्रिटनमध्ये आजही 32 हजारांहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. शिवाय कोरोनाच्या

नव्या रूपातील डेल्टा व्हेरिएंटच्या

रुग्णांची संख्याही ब्रिटनमध्ये वाढते आहे. अशा स्थितीतही पंतप्रधान जॉन्सन यांनी 19 जुलैपासून देशातील सर्व निर्बंध हटवण्याचा निश्चय केला आहे. ब्रिटनचा हा निर्णय धाडसी असला तरी तो आत्मघातकी ठरू शकतो. पुन्हा हा आत्मघात केवळ ब्रिटनपुरताच मर्यादित राहणार नाही तर संपूर्ण जगासाठी हे धाडस धोकादायक ठरू शकते. चीनच्या एका शहरातून बाहेर पडलेला हा विषाणू हा हा म्हणता सातासमुद्रापलीकडे पोहचल़ा संपूर्ण जगच या विषाणूने व्यापून टाकले. कोटय़वधी लोकांना त्याची लागण झाली. 40 लाखांहून अधिक लोक मृत्युमुखी पडले. ही सगळी भयंकर स्थिती डोळय़ासमोर असताना कोरोनाला रोखण्यासाठी निर्धारित करण्यात आलेले सर्व निर्बंध रद्द करून जनतेला मुक्त संचाराची मोकळीक देणे ही केवळ ब्रिटनसाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी डोकेदुखी ठरू शकते. सततच्या लॉक डाऊनमुळे गेल्या दीड-दोन वर्षांत जगभरातील देशांची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली, व्यापार उद्योग बुडाले, बेरोजगारी वाढली. यातून मार्ग काढण्यासाठी जगरहाटी सुरू करणे आवश्यक आहे हे खरेच, पण त्यासोबत मास्क आणि सोशल डिस्टंसिंगचे निर्बंध संपूर्ण हटवणे हा जिवाशी खेळ ठरू शकतो. तरीही कोरोनामुळे सवा लाखांहून अधिक बळी गेलेल्या ब्रिटनने हा निर्णय घेतला.

कोरोनासोबत जगायला शिका

असा संदेश देऊन ब्रिटनच्या पंतप्रधानांनी संपूर्ण निर्बंध हटवण्याची घोषणा केली असली तरी कोरोनाचा समर्थपणे मुकाबला करण्यात यशस्वी ठरलेल्या न्यूझिलंडसारख्या देशाने मात्र या भूमिकेला विरोध केला आहे. कोरोनामुळे न्यूझिलंडमध्ये केवळ 26 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. न्यूझिलंड सरकारने निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी केल्यामुळेच तिथे कोरोनाचा उद्रेक झाला नाही. त्यामुळेच ‘कोरोनासोबत जगा’ हे ब्रिटनचे धोरण आम्ही स्वीकारणार नाही आणि निर्बंधही हटवणार नाही, असे न्यूझिलंडच्या पंतप्रधान जसिंडा आर्डेन यांनी स्पष्ट केले आहे. अचानक एका सकाळी उठून आजपासून कोविडच्या आधी होती तशी जीवनशैली सुरू करण्याची घोषणा करता येणार नाही अशी सावध भूमिका न्यूझिलंड सरकारने घेतली आहे. एकीकडे कोरोनाचा नवीन डेल्टा व्हेरिएंट जगभरात धुमाकूळ घालतो आहे. त्यापाठोपाठ ‘लॅमडा’ नावाचा नवीन कोरोना विषाणू दक्षिण अमेरिकेत आढळला आहे. कोरोनाचा मूळ विषाणू आणि डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही ‘लॅमडा’ हा व्हेरिएंट अधिक प्राणघातक आहे. ब्रिटनमध्येही त्याचे काही रुग्ण आढळले आहेत. असे असतानाही मास्कसह सर्व निर्बंध हटवण्याचा ब्रिटनचा निर्णय आत्मघातकी ठरू शकतो.